Join us  

ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी घरी बनवण्याची मस्त रेसिपी, आणि करा पाणीपुरी फस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2023 1:10 PM

How To Make Pani Puri's Pani At Home : पाणीपुरी घरच्या घरी करताना स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचे पाणी घरी कसे तयार करायचे...

रस्त्यांच्या कडेला असणारे चाटचे ठेले आणि त्या चाटची चटकदार चव... कुणाला आवडत नाही..? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चाट आवडतच. रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. रस्त्यावर, चौकात, नाक्यावर असणाऱ्या गाड्यांवर, मिळणारे हे चाट सगळ्यांचा जीव का प्राण आहेत.चाट मधला अतिशय लोकप्रिय पदार्थ, पाणी पुरी. चाट मूळचे उत्तर भारतीय, त्यातल्या त्यात पाणीपुरी सगळ्या भारतात मिळते.

दिल्ली मध्ये गोलगप्पे, महाराष्ट्रात पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका असे या चटकदार पाणीपुरीला संबोधले जाते. काही लोकांना बाहेरच्या चाट सेंटरवर खाणं आवडत नाही, आणि सध्या बाहेरच खाणं थोडं जिकिरीचं झालं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना घरच्या घरी चाट बनवून मनसोक्त आनंद घेत खाणे खूपच आवडते. पाणीपुरी घरच्या घरी करताना स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचे पाणी घरी कसे तयार करायचे याबाबत प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका. स्ट्रीट स्टाईल घरच्या घरी पाणीपुरीचे पाणी कसे तयार करायचे हे समजून घेऊया(How To Make Pani Puri's Pani At Home). 

साहित्य :-

१. पुदिना - २ कप २. कोथिंबीर - १ कप ३. कढीपत्ता - २ ते ३ काड्या ४. हिरव्या मिरच्या - ५ ते ६ ५. जलजीरा पावडर - १ टेबलस्पून ६. जिरे पावडर - १ टेबलस्पून ७. पाणीपुरी पावडर मसाला - १ ते १. १/२ टेबलस्पून ८. हिंग - १/२ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार १०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ११. पाणी - गरजेनुसार १२. जिरे - १/२ टेबलस्पून १३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१४. खारी बुंदी - आवडीनुसार १५ . लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 

ohyumness या इंस्टाग्राम पेजवरून परफेक्ट स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचे पाणी घरच्या घरी कसे तयार करावे याची रेसिपी शेअर करण्यात आली आहे. 

 

 

कृती : -

१.  मिक्सरच्या एका भांड्यात कोथिंबीर, पुदिन्याची पाने, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जलजीरा पावडर, जिरे पावडर, पाणीपुरी पावडर मसाला, हिंग, मीठ, लिंबाचा रस, पाणी, लाल मिरची पावडर, आवश्यकतेनुसार मीठ घालून या सगळ्या मिश्रणाची पातळ पेस्ट करून घ्यावी. २. आता हे पातळ मिश्रण एका गाळणीतून गाळून घ्यावे. आणि चोथा फेकून द्यावा. तयार झालेल्या मिश्रणात आपल्या गरजेनुसार पाणी घालून घट्ट किंवा पातळ करून घ्यावे. ३. आता त्यात १/२ टेबलस्पून जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आवडीनुसार खारी बुंदी घालून पाणीपुरीचे पाणी पुरी आणि गरमागरम रगड्यासोबत सर्व्ह करावे. 

चटपटीत, चटकदार स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचे पाणी खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती