Join us  

नेहमी तीच ती कोशिंबीर खाऊन कंटाळा आला? कुणाल कपूर सांगतात, ग्रीक काकडी सॅलेड रेसिपी, उन्हाळा होईल गारेगार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2023 12:58 PM

Greek Cucumber Salad Recipe by Chef Kunal Kapoor : शेफ कुणाल कपूर सांगतात ग्रीक कुकुंबर सॅलेडची चविष्ट आणि आगळीवेगळी रेसिपी

उन्हाळा म्हटला की गरमीमुळे सतत घाम येतो आणि शरीराची लाहीलाही होते. या दिवसांत शरीराला पाण्याची आणि क्षारांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. अशावेळी आपण आहारात नेहमीच्या घटकांबरोबरच पाणी आणि क्षार असलेल्या पदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश करतो. यात कलिंगड, खरबूज अशी पाणीदार फळे, सरबतं, ताक, काकडी असे पाणीदार पदार्थ वाढवतो. काकडी सॅलेड म्हणू चिरुन खाण्याबरोबरच आपण गारेगार काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात आवर्जून खातो. काकडी किसून किंवा चोचून आपण दही किंवा लिंबू घालून ही कोशिंबीर करतो (Greek Cucumber Salad Recipe by Chef Kunal Kapoor). 

पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या कोशिंबीरीला आपण मिरची, जीऱ्याची फोडणीही देतो. मग आवडीनुसार त्यात दाण्याचा कूट किंवा खोबरं असं घातलं जातं. शरीराला पाणी आणि फायबर्स देणारी काकडी उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देते. नेहमी एकाच पद्धतीची कोशिंबीर करण्यापेक्षा याच काकडीपासून जेवणाची रंगत वाढेल अशी थोडी वेगळी कोशिंबीर केली तर? प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यासाठीच ग्रीक कुकुंबर सॅलेडची चविष्ट आणि आगळीवेगळी रेसिपी शेअर करतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी याचा व्हिडिओ शेअर केला असून ही कोशिंबीर कशी करायची पाहूया...

(Image : Google)

साहित्य - 

१. काकडी - २ 

२. घट्ट दही - अर्धी वाटी 

३. मीठ - चवीपुरते 

४. मिरपूड - पाव चमचा 

५. लसूण - अर्धा चमचा 

६. पाणी - ४ चमचे 

७. पुदीना - मूठभर

८. आक्रोड - मूठभर 

कृती -

१. काकडी स्वच्छ धुवून काकडीचे एकसारखे अर्धगोलाकार तुकडे करुन घ्या. तुमच्या आवडीनुसार काकडीची साले काढली किंवा तशीच ठेवली तरी चालेल.

२. एका बाऊलमध्ये दही, मीठ आणि मिरपूड एकत्र करा. 

३. लसूण बारीक चिरुन त्यात पाणी घालून ते थोडे उकळा आणि हे पाणी गाळून दह्यात घाला. 

४. हे दही चांगले एकजीव करुन त्यात चिरलेली पुदीन्याची पाने आणि चेरलेली काकडी घालायची. 

५. या सॅलेडला लसूण, दही आणि पुदीन्याचा छान फ्लेवर येतो. वरुन आक्रोडाचे बारीक काप घालायचे आणि हे सॅलेड खायला घ्यायचे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल