कोण काय करेल याच काही नेम नाही.. खाण्या- पिण्याच्या गोष्टीत तर नवनवीन प्रकार करून बघण्याचा आणि ते प्रयोग सोशल मिडियावर शेअर करण्याचा चांगलाच ट्रेण्ड सध्या गाजतो आहे.. यामुळे कोणता पदार्थ कशासोबत आणि कोणत्या पद्धतीने खाल्ला जाईल, हे काही सांगता येत नाही.. आता हेच बघा ना सोशल मिडियावर सध्या एका पदार्थाची जबरदस्त चर्चा सुरू आहे... हा पदार्थ एवढा अतरंगी आहे की पदार्थाचं नाव ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावतात... प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळविणारा हा पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचा हलवा (Green chilli halwa)...
हलवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गाजर, दुधी भोपळा, मुगाची डाळ असे पदार्थ येतात.. फारच मनावर घेतलं तर बटाटा किंवा गाजर यांचाही हलवा करण्याचा विचार एखाद्याच्या डोक्यात येऊ शकतो.. पण इथे तर चक्क हिरव्या मिरचीचा हलवा बनविण्याचा प्रयोग करण्यात आला आहे... आणि ते ही सिमला मिरची नाही... तर हिरवीगार झणझणीत असणारी आपण तेजतर्रार मिरची... इथे मिरचीचा एवढासा ठेचा खातानाही अनेक जणांची पुरती वाट लागून जाते, तर मिरचीचा चक्क हलवाच खायचा, म्हणजे खाणाऱ्याचे काय हाल होत असतील, याचा नुसता विचार केलेलाच बरा..
तर त्याचं झालं असं की हिरव्या मिरचीच्या हलव्याचा फोटो राना साफवी या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.. काजू, बदाम, मणुके घालून तयार करण्यात आलेल्या या हलव्याचा फोटो त्यांनी शेअर केला असून त्याखाली हरी मिर्च का हलवा असं लिहिलं आहे.. बघता बघता हा पदार्थ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यापैकी बहुतेक जणांनी आपण हा मिरचीचा हलवा आजवर कधीच खाल्लेला नाही, तो कसा लागतो.. अशा पद्धतीच्या कमेंट टाकल्या आहेत.
Sardi ke liye Hari mirch ka halwa pic.twitter.com/dcIPJEITdB
— Rana Safvi رعنا राना (@iamrana) January 27, 2022
कसा करायचा मिरचीचा हलवा?
how to make mirchi ka halwa?
मिरचीचा हलवा खरोखरंच बनवता येतो.. त्यामुळे हा फोटो पाहून जर तुम्हाला मिरचीचा हलवा कसा बनवायचा असा प्रश्न पडला असेल तर ही घ्या रेसिपी. वाचा, बघा आणि करून पहा हा अतरंगी प्रकार...
- मिरचीचा हलवा करण्यासाठी सगळ्यात आधी मिरचीचे खालचे आणि वरचे टोक काढून टाका. मिरची मधोमध कापा आणि त्यातल्या सगळ्या बिया देखील काढून टाका. आपण या रेसिपीसाठी अर्धा किलो हिरवी मिरची घेतली आहे.
- आता एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते गॅसवर तापत ठेवा. पाणी तापले की त्यात ५० ग्रॅम तुरटी टाका. त्यानंतर त्यात आपण बिया काढून टाकलेल्या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाका. पाण्याला उकळी येईपर्यंत मिरच्या पाण्यातच ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर मिरच्या वेगळ्या करा आणि पाणी टाकून द्या. पुन्हा नवे पाणी घ्या. नव्याने तुरटी टाका. त्यात पुन्हा याच मिरच्या टाळा, उकळी आली की पाणी पुन्हा टाकून द्या. ही क्रिया ४ ते ५ वेळा रिपिट करा. असे केल्याने मिरचीचा तिखटपणा निघून जातो.
- ४ ते ५ वेळा ही क्रिया केल्यानंतर मिरचीचा रंग बदलेल.. आता या मिरच्यांची मिक्सरच्या मदतीने पेस्ट करा.
- कढई गॅसवर तापत ठेवा.. कढई तापली की त्यात दोन ते तीन टेबलस्पून तूप टाका.
- तूप तापल्यावर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट टाका आणि ५ ते ७ मिनिटे ती परतून घ्या. पेस्ट परतत असतानाच त्यात विलायची टाका. कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या.
- आता त्यात २०० ग्रॅम खवा टाका. खवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात १५० ग्रॅम साखर टाका. ही सगळी क्रिया कमी ते मध्यम आचेवर करावी.
- साखर विरघळल्यानंतर त्यात मनुके आणि तुमच्या आवडीचा सुकामेवा टाका. अर्धा चमचा गुलाब पाणी टाका आणि पुन्हा हलवा थोडा शिजू द्या आणि घट्ट होऊ द्या...
- मस्त, चवदार मिरचीचा हलवा झाला तयार.. हा हलवा अजिबातच तिखट लागत नाही, असं शेफ पुनीत नारंग सांगत आहेत.