Join us  

१ वाटी हिरव्या मुगाचे करा जाळीदार डोसे; ब्रेकफास्टसाठी परफेक्ट प्रोटीन पॅक रेसिपी, चवही जबरदस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 12:03 PM

Green Moong Dosa Easy and Healthy Recipe : घाईच्या वेळात झटपट होणारी चविष्ट रेसिपी...

नाश्त्याला सारखं पोहे, उपीट, फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो. घरात लहान मुलं असतील तर त्यांना सतत काहीतरी वेगळं हवं असतं. आहारात कडधान्यांचा समावेश असायला हवा असं नेहमी सांगितलं जातं. म्हणूनच थोडा वेगळा आणि प्रोटीनयुक्त नाश्ता करण्याचा विचार करत असाल तर हिरव्या मूगाचे डोसे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. हिरव्या मुगात फेनोलिक अॅसिड, अमीनो अॅसिड, कार्बोहायड्रेट, लिपीड, अँटीऑक्सिडंटस, अँटीबायोटीक आणि अँटीइनफ्लमेटरी गुण असतात (Green Moong Dosa Easy and Healthy Recipe).

तसेच यामध्ये मॅगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध बी व्हिटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटकही असतात.  हिरव्या मूगाचे नियमितपणे सेवन केल्यास हृदयरोग, मधुमेह यांसारखे आजार दूर राहण्यास मदत होते. हिरव्या मूगाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात, रक्ताची कमतरता भरुन निघते. तसेच पचनक्रिया सुरळीत होऊन ताण कमी होण्यासही हिरवे मूग खाणे फायद्याचे ठरते. 

(Image : Google)

साहित्य - 

१. हिरवे मोड आलेले मूग - १ वाटी 

२. रवा - अर्धी वाटी 

३. दही - अर्धी वाटी 

४. आलं, मिरची, लसूण पेस्ट - १ चमचा 

५. कोथिंबीर - अर्धी वाटी 

६. मीठ - चवीनुसार

७. साखर - अर्धा चमचा 

८. धणे-जीरे पावडर - पाव चमचा 

९. तेल - पाव वाटी 

कृती -  

१. हिरवे मूग भिजवून त्याल उसळीसाठी मोड आणतो त्याप्रमाणे मोड आणा. 

(Image : Google)

२. सकाळी हे मूग आलं, मिरची, लसूण घालून मिक्सरमधून बारीक करुन घ्या. 

३. त्यानंतर यामध्ये रवा, दही आणि मीठ, साखर, धणे-जीरे पावडर घालून एकजीव करुन घ्या. 

४. यामध्ये कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ एकजीव करुन झाकून अर्धा तास बाजूला ठेवा.

५. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, किसलेले गाजर, बीट, कोबी असे घालू शकता. भाज्यांमुळे पौष्टीकता वाढते आणि लहान मुलांच्या पोटात भाज्या जायला मदत होते. 

६. सकाळच्या घाईत सॉस, चटणी किंवा दह्यासोबत हे गरमागरम डोसे चांगले लागतात. तवा तापलेला असेल तर डोसे होतातही पटापट. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.