बाजारात मटार दिसायला लागले की आपल्याला मटारचे काय काय पदार्थ करु असे होऊन जाते. मटार भात, पावभाजी, मटार उसळ, मटार कटलेट हे सगळे आपण नेहमीच करतो. पण मटार करंजी आपण करतोच असे नाही. खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट अशी ही मटार करंजी करायला सोपी असून चवीलाही अतिशय छान लागते. यासाठी फारसा वेळ लागत नसून अगदी कमीत कमी पदार्थांमध्ये झटपट होणारी ही रेसिपी थंडीच्या दिवसांत खायला फार मस्त लागते. सकाळच्या नाश्त्याला, ४ वाजताच्या चहासोबत किंवा अगदी जेवणातही साईड डीश म्हणून आपण हा पदार्थ नक्की करु शकतो. विकतचे तळलेले सामोसे, वडे खाण्यापेक्षा घरीच असा चविष्ट पदार्थ केला तर बाहेर काहीतरी चमचमीत खावे अशी इच्छाही होणार नाही आणि लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळेच हा पदार्थ खाऊन मनोमन खूश होतील. पाहूया मटार करंजी करण्याची सोपी रेसिपी (Green Peas Matar Karanji Easy Recipe)...
साहित्य -
१. मटार - २ वाट्या
२. कांदा - १ वाटी (बारीक चिरलेला)
३. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा
४. लिंबाचा रस - १ चमचा
५. धने-जीरे पावडर - अर्धा चमचा
६. मीठ - चवीनुसार
७. साखर - चवीनुसार
८. कोथिंबीर - अर्धी वाटी
९. शेव - अर्धी वाटी
१०. मैदा किंवा गव्हाचे पीठ - २ वाट्या
११. तेल - २ वाट्या
कृती -
१. पोळीसाठी मळतो तशी थोडी घट्टसर कणीक मळून घ्यावी.
२. मटार थोडे वाफवून हाताने किंवा रवीने ओबडधोबड बारीक करुन घ्यावेत.
३. कढईत तेलात बारीक चिरलेला कांदा सोनेरी परतून घ्यावा.
४. मटारमध्ये परतलेला कांदा, आलं-मिरची लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, मीठ, लिंबाचा रस, साखर, बारीक शेव, चिरलेली कोथिंबीर सगळे घालून मिश्रण हाताने एकजीव करावे.
५. कणकेचे लहान गोळे करुन त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.
६. त्यामध्ये हे मिश्रण भरुन आपण करंजीला दुमडतो तसे दुमडून फिरकीने कडा कापून घ्याव्यात.
७. कढईत तेल घालून मध्यम आचेवर करंज्या तळून घ्याव्यात.
८. या करंज्या गरमागरम चिंचेची चटणी, सॉस किंवा नुसत्याही खायला अतिशय छान लागतात.