सध्या बाजारात हिरवे टोमॅटो खूप जास्त प्रमाणात आले आहेत. लाल टोमॅटोची जशी एक वेगळीच चव असते, तशी हिरव्या टोमॅटोंचीही आगळी खासियत आहे. आणि त्यांची चवही खूपच वेगळी लागते. या टोमॅटोची चवदार भाजी आपण नेहमीच करतो. आता थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करा आणि हिरव्या टोमॅटोंची झणझणीत हिरवीगार चटणी (Green Tomato Chutney) करून बघा.. ही चटणी चवीला अतिशय उत्तम लागते. हिरव्या मिरच्या, गूळ आणि खमंग फोडणी यामुळे चटणीची चव आणखीनच बहारदार होते, यात शंकाच नाही. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. ही चटणी जेवणात तोंडी लावायला तर घ्याच, पण पोळी, थालिपीठ, पराठा यासोबत तुम्ही सॉस, लाेणचे याप्रमाणेही खाऊ शकता.(spicy and delicious recipe just in 10 minutes)
कशी करायची हिरव्या टोमॅटोची चटणी?
साहित्य
२ मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ३ ते ४ टेबलस्पून गूळ, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे आणि हिंग.
कृती
- सगळ्यात आधी टोमॅटो मध्यम आकाराच्या फोडींमध्ये कापून घ्या. फोडी खूप लहान किंवा खूप मोठ्या नसाव्या.
- त्यानंतर कढईमध्ये थोडे तेल टाका. तेल गरम झाले की त्यात मिरच्या टाकून परतून घ्या.
- मिरच्या परतून घेतल्या की त्या कढईतून काढा आणि त्याच कढईत टोमॅटोच्या फोडी टाकून त्या ही परतून घ्या.
- फोडी थोड्या थंड होऊ द्या.
- त्यानंतर मिक्सरमध्ये परतून घेतलेले टोमॅटो, परतलेल्या मिरच्या, गुळ आणि मीठ हे सगळे मिश्रण व्यवस्थित वाटून त्याची पेस्ट करून घ्या.
- आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा आणि त्यावरून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी द्या..
- चटकदार आंबट- गोड- तिखट चवीची चटणी तयार.
हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे
- हिरव्या टोमॅटोमध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात असते.
- हिरव्या टोमॅटोमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि पोटॅशियम मिळते.
- उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास हिरवे टोमॅटो फायदेशीर ठरतात.
- हिरव्या टाेमॅटोमध्ये असणारे बीटा कॅरेटीन डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.