गुढी पाडव्याला म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी, नव्या संकल्पांची, भरारीची ही गुढी सूर्यास्ताच्या वेळी उतरवली जाते. गुढीला (Gudhi Padwa 2022) आवर्जून बांधल्या जाणाऱ्या गाठींना या दिवशी विशेष महत्त्व असते. साखरेपासून तयार केली जाणारी ही गाठी गुढीला बांधण्याबरोबरच घरातील लहान मुलांच्या गळ्यात घालण्याचीही पद्धत आहे. लहान मुलांना उन्हाळा बाधू नये म्हणून ही गाठी खाण्यास दिली जाते. इतकेच नाही तर गाठीचे पाणीही प्यायला दिले जाते. हे सगळे ठिक असले तरी गुढीला बांधलेल्या गाठींचे आणि लहान मुलांना आलेल्या गाठींचे करायचे काय असा प्रश्न घरातील गृहीणींसमोर पडू शकतो. त्यासाठीच या गाठींचे काय करता येईल याचे काही पर्याय आता आपण पाहणार आहोत.
१. पाक
गाठींचे तुकडे करुन आपण त्याचा पाक तयार करु शकतो. हा पाक आपण गुलाबजाम, किंवा अगदी सुधारस म्हणूनही वापरु शकतो. इतकेच नाही तर नारळी पाकातले लाडू तयार करण्यासाठीही या पाकाचा उपयोग होऊ शकतो. काहीच नाही तर यामध्ये लाह्या किंवा चुरमुरे घातले तर त्याचे छान लाडू तयार होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याना जाता येता गोड खायला लागतं तेव्हा हे लाडू उपयोगी येतात.
२. साखरेचे पाणी
या गाठी पाण्यात बुडवून ठेवल्या तर त्या विरघळतात. उन्हातून दमून आल्यावर दोन घोट हे गोड पाणी प्यायल्यास आपल्याला एकदम तरतरी आल्यासारखे वाटते. इतकेच नाही तर उन्हाळ्यात आपण अनेकदा थंडावा मिळण्यासाठी सरबत, ज्यूस करतो. त्यावेळी आपण पाण्यात साखर घालतोच, त्यावेळी हे साखरेचे पाणी वापरल्यास वेगळी साखर वापरायची आवश्यकता नसते.
३. पिठीसारख
या गाठींचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून आपण पिठीसारख तयार करुन ठेवू शकतो. जेणेकरुन कोणत्याही पदार्थाला साखर म्हणून घालायला त्याचा उपयोग होतो. भाजी, आमटी अगदी चहालाही ही साखर आपण साध्या साखरेप्रमाणे वापरु शकतो. गाठींमध्ये असणारी साखर ही सामान्य साखरेप्रमाणेच गोड लागत असल्याने त्याचा आपण साखरेसारखाच उपयोग करु शकतो.