गुढी पाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचे स्वागत आपण मोठ्या उत्साहात करतो. देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यासाठी आणि तोंड गोड करण्यासाठी आपण या दिवशी आवर्जून श्रीखंड किंवा आम्रखंड करतो. पण सध्या ऐन उन्हाळ्यात अचानक पाऊस, वारा असे हवामान बदलल्याने सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. लीना बावडेकर म्हणाल्या, आपण उन्हाळा असल्याने साधारणपणे श्रीखंड किंवा आम्रखंड गार खातो. पण सर्दी असेल तर फ्रिजमध्ये ठेवलेले गार श्रीखंड खाऊ नये. आधीच कफ किंवा सर्दी असेल आणि त्यावर गार खाल्ले तर त्रास वाढू शकतो. पण तुम्ही श्रीखंड खाल्ल्याने तुम्हाला सर्दी किंवा कफाचा त्रास होत नाही. त्यामुळे ज्यांना सर्दी कफ नाही त्यांनी श्रीखंड खायला हरकत नाही. अशावेळी करता येतील असे पदार्थ..
१. शेवयाची खीर
खीर हा पारंपरीक पदार्थ असून श्रीखंड नको असेल तर आपण शेवयाची खीर करु शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार खीर खायलाही मस्त लागते आणि करायलाही सोपी असते. तूप, सुकामेवा, साखर, वेलची पूड आणि शेवया, चारोळ्या यांपासून केली जाणारी ही खीर खायलाही पौष्टीक असते. त्यामुळे श्रीखंडाला पर्याय म्हणून तुम्ही ही खीर करु शकता.
२. पाकातल्या पुऱ्या
पाकातल्या पुऱ्या हा अतिशय पारंपरिक पदार्थ असून मैद्याच्या पुऱ्या करायच्या आणि त्या साखरेच्या पाकात लिंबू, केशर, वेलची पूड, सुकामेवा घालून त्यात घालायच्या. या पुऱ्या पाकात भिजल्या की अतिशय चविष्ट लागतात. पूर्वी घरी अचानक पाहुणे येणार असले की हा पदार्थ आवर्जून केला जायचा. पण आता तो काही प्रमाणात मागे पडला.
३. दलिया
दलिया हा मिष्टान्नामधील आणखी एक पौष्टीक आणि झटपट होणारा पदार्थ. अर्धवट फोडलेले गहू कुकरमध्ये शिजवायचे. ते तूपावर भाजून त्यामध्ये गूळ, वेलची पूड, सुकामेवा, दूध आणि ओले खोबरे घालायचे. पोटभरीची अशी ही खीर अतिशय छान लागते.