Join us  

थंडीत शरीराची ताकद वाढण्यासाठी करा गुजराथी पद्धतीचे चुरमा लाडू, घ्या पारंपरिक-चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 9:50 AM

Gujarati Style Churma Ladoo Recipe : भुकेच्या वेळी इतर काही खाण्यापेक्षा अशाप्रकारचे लाडू खाणे केव्हाही फायद्याचे ठरते

थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला ऊर्जा आणि स्निग्धता मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपण आहारात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थांचा समावेश करतो. यामुळे शरीराची ताकद भरुन येण्यास मदत होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत आपण आहारात सुकामेवा, तूप, भाज्या, फळं, धान्य, डाळी यांसारख्या गोष्टींचा पोषण देणाऱ्या गोष्टींचा समावेश करतो. इतकेच नाही तर या दिवसांत आपण विविध प्रकारचे लाडूही आवर्जून खातो. यामध्ये पौष्टीक लाडू, डींकाचे, बेसनाचे, सुकामेव्याचे, नाचणीचे लाडू खातो. भुकेच्या वेळी इतर काही खाण्यापेक्षा अशाप्रकारचे लाडू खाणे केव्हाही फायद्याचे ठरते. गुजरातमध्ये प्रसाद म्हणून किंवा एरवीही आवर्जून केले जाणारे लाडू म्हणजे चुरमा लाडू (Gujarati Style Churma Ladoo Recipe). 

चुरमा लाडू हे गव्हाच्या पीठापासून केले जातात हे आपल्याला माहित आहे पण हा चुरमा नेमका कसा करायचा आणि हे लाडू खमंग होण्यासाठी नेमके काय करायचे हे आपल्याला माहित नसते. भरपूर प्रमाणात तूप असलेले आणि तोंडात घातले की विरघळणारे हे लाडू फारच चविष्ट लागतात. यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर केला जात असून त्यासाठी खूप वेगळे काही करावे लागते असे काहीच नाही. लहान मुलं, अशक्तपणा असलेल्या व्यक्ती किंवा ज्येष्ठ मंडळींसाठी हे लाडू खाणे खूप ताकद देणारे असते. पाहूयात हे लाडू करण्याची सोपी पद्धत...

साहित्य -

१. गव्हाचे पीठ - ३ वाट्या 

२. गूळ - १ वाटी 

३. तूप - २ वाट्या 

४. भाजलेले काजू आणि बदाम - २ चमचे 

(Image : Google)

५. मनुके - १ चमचा 

६. किसलेलं खोबरं - १ चमचा 

७. वेलची पावडर - १ चमचा 

८. खसखस - ३ ते ४ चमचे 

९. तेल - १ वाटी 

कृती - 

१. एका वाडग्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात तेल आणि पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचे.

२. त्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्यांचे ४ भाग करायचे आणि ते तेलातून तळून काढायचे. 

३. हे तळलेले तुकडे मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. 

४. कढईमध्ये तूप घालून ते गॅसवर ठेवायचे आणि त्यामध्ये गूळ घालून यांचे पातळ मिश्रण करुन घ्यायचे.

५. मिक्सरमधून बारीक केलेल्या मिश्रणात हे तूप आणि गुळाचे मिश्रण घालायचे. 

६. यामध्ये मनुके, भाजलेले काजूचे आणि बदामाचे काप, किसलेले खोबरे आणि वेलची पूड घालायची. 

७. हे मिश्रण एकजीव करुन त्याचे एकसारखे लाडू वळायचे.

८. हे लाडू खसखसमध्ये घोळवून खायला घ्यायचे.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.