Join us  

२ वाटी गव्हाच्या पिठात १५ मिनिटांत करा खमंग गूळ पापडी, आजीची थंडी स्पेशल पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 1:41 PM

Gul Papdi Authentic Traditional Sweet Recipe : लहान मुलांना आणि मोठ्यांनाही झटपट एनर्जी देणाऱ्या या वड्या कशा करायच्या पाहूया.

ठळक मुद्देघरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारी खमंग स्वीट डीशमुलांना खाऊच्या डब्यात किंवा मधल्या वेळचा खाऊ म्हणून उत्तम पर्याय

कधी जेवण झाल्यावर तर कधी मधल्या वेळात अनेकांना तोंडात घालायला गोड काहीतरी लागतं. आता रोज गोड काय खायचं असा प्रश्नही अनेकांपुढे असतो. त्यातही हे गोड पौष्टीक असेल तर आणखी चांगलं. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारी अशीच एक पारंपरिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत. गूळ पापडी असं या रेसिपीचं नाव असून तोंडात ठेवताच विरघळणारी ही भन्नाट रेसिपी करायलाही अगदी सोपी आहे. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून होत असल्याने त्यासाठी फारसे जिन्नसही लागत नाहीत. लहान मुलांना आणि मोठ्यांनाही झटपट एनर्जी देणाऱ्या या वड्या कशा करायच्या पाहूया (Gul Papdi Authentic Traditional Sweet Recipe). 

साहित्य - 

१. गव्हाचं पीठ - २ वाट्या

२. तूप - १ वाटी 

३. तीळ - १ चमचा 

(Image : Google)

४. गूळ - १ ते १.५ वाटी

५. खसखस - २ चमचे 

६. सुकं खोबरं - अर्धी वाटी

७. वेलची पूड - अर्धा चमचा 

कृती - 

१. गूळ पापडीसाठी नेहमीच्या पीठापेक्षा गव्हाचे पीठ थोडे जाडसर दळून आणावे. बाजारात मिळणारे पीठही यासाठी वापरु शकतो.

२. एका पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये हे पीठ घालावे.

३. १० ते १२ मिनीटे हे पीठ खमंग भाजून घ्यावे. त्यामुळे त्याचा रंग बदलतो आणि छान स्वादही येतो. 

४. यासाठी तूप बऱ्यापैकी जास्त लागते, ज्यामुळे वडी खमंग होण्यास मदत होते. 

५. पीठ चांगले भाजले गेले की यामध्ये गूळ, वेलची पूड घालावी. 

६. त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस आणि खसखस घालून हे पुन्हा चांगले एकजीव करावे. 

७. आवडीनुसार आपण यामध्ये जायफळ पूड, सुकामेव्याचे काप असे काहीही घालू शकतो.

८. गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण चांगले हलवून एकजीव करायचे आणि मग गॅस बंद करायचा.

९. एका ताटलीला किंवा ट्रेला तूप लावून त्यावर तीळ घालावेत आणि हे मिश्रण त्यामध्ये काढून एकसारखे थापावे. 

१०. गरम असतानाच याच्या चौकोनी वड्या पाडायच्या आणि गार झाल्यावर आपण ही वडी खाऊ शकतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.