Join us  

गुळांबा- साखरांबा आवडतो, पण कधी दगड होतो तर कधी पातळ? घ्या परफेक्ट पारंपरिक सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 12:19 PM

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि अगदी झटपट होणारा गुळांबा किंवा साखरांबा कसा करायचा ते पाहूया...

ठळक मुद्देतोंडाला चव आणि उन्हामुळे आलेली मरगळ घालवणारा गुळांबा नक्की करुन बघापोळीशी खायला होणारी झटपट सोपी रेसिपी

उन्हाळा म्हटला की बाजारात आंबा, कैरी यायला लागतात. कैरी ही वर्षातून एकदाच येत असल्याने या काळात तोंडाची गेलेली चव आणण्यासाठी आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ करतो. उकाड्यामुळे आधीच तोंडाला चव नसते. उन्हामुळे जेवणही नीट जात नाही. पण अशात तोंडाला चव आणणारे आणि जेवण जाईल असे पानात काही असले की चिंता नाही. कैरी म्हटले की आपल्याला कच्च्या कैरीपासून ते कैरीचे आंबट-गोड लोणचे, मेथांबा, पन्हे असे बरेच पदार्थ आठवतात. पण कैरीचा आणखी एक छान पदार्थ करता येतो तो म्हणजे गुळांबा किंवा साखरांबा. 

(Image : Google)

सारखी पोळी-भाजी खायचा कंटाळा आला तर पोळीशी गुळांबा किंवा साखरांबा घेतला की जेवण कधी होतं तेच कळत नाही. आंबट गोड चवीचा हा गुळांबा म्हणजे उन्हाळ्यात जेवण गोड करणारा पदार्थ. कमीत कमी पदार्थात होणारा आणि वर्षभर टिकणारा हा पदार्थ आपण नक्कीच करुन ठेऊ शकतो. घाईच्या वेळी किंवा एखादवेळी भाजी नसेल तर गुळांबा किंवा साखरांबा सोबत पोळी खाता येते. मात्र याच्या पाकाचा अंदाज आला नाही तर एकतर तो कडक होतो नाहीतर खूप पातळ. पाहूयात घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि अगदी झटपट होणारा गुळांबा किंवा साखरांबा कसा करायचा ते पाहूया... 

(Image : Google)

साहित्य - 

१. कैरीचा किस - २ वाट्या२. गूळ किंवा साखर - २ वाट्या३. वेलची पावडर - पाव चमचा३. मीठ - पाव चमचा

कृती - 

१. कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करुन घ्याव्यात.२. किसणीने कैरी किसून घ्यावी.३. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये किसलेली कैरी घालावी.४. त्यामध्ये त्याच प्रमाणात गूळ किंवा साखर घालावी. ५. हे मिश्रण चांगले हलवून एकजीव करत ७ ते ८ मिनीटे शिजू द्यावे.६. त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि मीठ घालावे. ७. पाक आणि कैरीचा किस एकजीव होत आले की गॅस बंद करावा.८. गार झाल्यावर हा गुळांबा किंवा साखरांबा कोरड्या केलेल्या बरणीत काढून ठेवावा. ९. जास्त कैऱ्यांचा करणार असाल तर फ्रिजमध्ये ठेवलेला केव्हाही चांगला कारण जास्त तापमान आणि ऊब लागल्याने याला भुरा येण्याची शक्यता असते. १०. साखरेपेक्षा गूळ वापरलेला केव्हाही चांगला, म्हणजे डायबिटीस असणारेही खाऊ शकतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.