Join us  

आजीच्या हातच्या गुळांबा-साखरांब्याची आठवण येते? घ्या पारंपरिक रेसिपी-गरम पोळीसोबत खा पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 11:59 AM

Gulamba Sakharamba Recipe Raw Mango Summer Special Recipe : गुळांबा किंवा साखरांबा मुलंही आवडीने खातात आणि यामुळे तोंडालाही चव येते.

उन्हाळ्याच्या दिवसांत कोरडे आणि रखरखीत हवामान असते. त्यामुळे अन्न जात नाही. एकतर सतत काहीतरी गार खावेसे किंवा प्यावेसे वाटते नाहीतर तोंडाला चव आणणारे चमचमीत काहीतरी खावे अशी इच्छा होते. दुपारी डोक्यावर कडक ऊन असताना आपल्याला जेवणात पोळी-भाजी अजिबातच नकोशी होते. अशावेळी तोंडी लावायला काहीतरी असेल तर जेवण जाते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत कैरीचे काही ना काही पदार्थ आवर्जून केले जातात. गुळांबा किंवा साखरांबा हा उन्हाळ्याच्या दिवसांत केला जाणारा पारंपरिक पदार्थ. या काळात बाजारात भरपूर कैऱ्या असतात. पारंपरिक पद्धतीने केला जाणारा गुळांबा किंवा साखरांबा मुलंही आवडीने खातात आणि यामुळे तोंडालाही चव येते. त्यामुळे मुलांना भाजी नको असेल तर विकतचे जाम किंवा आणखी काही देण्यापेक्षा झटपट होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा (Gulamba Sakharamba Recipe Raw Mango Summer Special Recipe).   

साहित्य - 

१. कैरीचा किस - २ वाट्या

२. गूळ किंवा साखर - २ वाट्या

३. वेलची पावडर - पाव चमचा

४. मीठ - पाव चमचा

५. तूप - २ चमचे

कृती - 

१. कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करुन घ्याव्यात.

२. किसणीने कैरी किसून घ्यावी.

३. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून किसलेली कैरी घालावी.

४. त्यामध्ये त्याच प्रमाणात गूळ किंवा साखर घालावी. 

५. हे मिश्रण चांगले हलवून एकजीव करावे आणि अंदाजे पाणी घालून ७ ते ८ मिनीटे शिजू द्यावे.

६. त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि चवीपुरते मीठ घालावे. 

७. पाक आणि कैरीचा किस एकजीव होत आले की गॅस बंद करावा.

८. गार झाल्यावर हा गुळांबा किंवा साखरांबा कोरड्या केलेल्या बरणीत काढून ठेवावा. 

९. जास्त कैऱ्यांचा करणार असाल तर फ्रिजमध्ये ठेवलेला केव्हाही चांगला कारण जास्त तापमान आणि ऊब लागल्याने याला भुरा येण्याची शक्यता असते. 

१०. साखरेपेक्षा गूळ वापरलेला चांगला, म्हणजे डायबिटीस असणारेही खाऊ शकतात

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.