नैवेद्याचा प्रसाद म्हणून आपण जेव्हा शिरा खातो, तेव्हा त्याची चव वेगळीच आणि आणखीनच स्वादिष्ट लागते. मग हा शिरा जेव्हा आपण खातो, तेव्हा साहजिकच मनात विचार डोकावतो की आपल्या नेहमीच्या शिऱ्याला अशी चव का बरं येत नसावी ? अशी टेस्ट जमून यायला सगळी सामग्री अगदी योग्य प्रमाणात पडणे गरजेचे आहे. त्यामुळे शिरा जर परफेक्ट करायचा असेल, तर प्रत्येक पदार्थाचे योग्य प्रमाण माहिती असावे. या सोप्या रेसिपीने जर शिरा बनवाल आणि देवाला नैवेद्य दाखवाल, तर देवासकट शिरा चाखून पाहणारी सगळीच मंडळी खूश होऊन जातील.
साहित्य
एक वाटी बारीक रवा, तेवढीच वाटी भरून साखर , पाऊण वाटी साजूक तूप, २ वाटी गरम दूध, १ वाटी कोमट पाणी, १/४ टीस्पून विलायची पावडर, बदाम, मनुके, काजू यांचे बारीक काप १/४ वाटी, केसर.
कसा करायचा नैवेद्याचा शिरा ?
सगळ्यात आधी तर कढई किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यामध्ये तूप घालावे.
तूप चांगले गरम झाल्यावर त्यात रवा टाकावा आणि खमंग परतून घ्यावा. रव्याचा रंग बदलून तो जरा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतू द्यावा. कारण रवा चांगला परतला गेला नाही, तर शिरा अगदीच बेचव लागतो आणि दिसायलाही पांढराफटक दिसतो.
यानंतर रवा परतून झाला आणि रव्याचा रंग बदलला की त्यामध्ये दूध आणि पाणी हळूहळू टाकावे. दूध आणि पाणी एकदम ओतू नये. यामुळे शिऱ्यामध्ये गाठी तयार होतात. दूध आणि पाणी टाकताना मिश्रण चमच्याने सारखे गोलाकार ढवळत रहावे.
यानंतर आता हळूहळू कढईतला शिरा आळून येण्यास सुरूवात होईल. शिरा आळून आला की मग त्यात साखर, केसराच्या ५ ते ६ काड्या आणि विलायची पावडर घालावी आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण नीट हलवावे. यानंतर कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. वाफ आल्यावर गॅस बंद करावा आणि त्यानंतर शिऱ्यावर सुकामेवा टाकावा.