आज आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आजचा दिवस अनेक घरांमध्ये गुरुची पूजा केली जाते. खास होम हवन केलं जातं. दिवसभर उपवास धरुन रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. बाहेरुन विकतची मिठाई आणण्यापेक्षा घरी स्वत:च्या हातानं तयार केलेली मिठाई देवाल नैवेद्य म्हणून दाखवला जातो. या नैवेद्यासाठी आज गुळाची खीर किंवा बेसनाचा हलवा करुन पहा. हे दोन्ही पदार्थ खास पुजेला नैवेद्य म्हणूनच केले जातात. हे दोन्ही पदार्थ चवीला उत्तम लागतात आणि आरोग्यासाठी ते पौष्टिकही आहेत.
गुळाची खीर
ही खीर तयार करण्यासाठी एक लिटर सायीचं दूध, 8-10 बदाम, 8-10 काजू, 80 ग्रॅम तांदूळ, 2 चमचे बेदाणे, 150 ग्रॅम किसलेला गूळ आणि अर्धा कप पाणी हे जिन्नस घ्यावं.
छायाचित्र: गुगल
गुळाची खीर करताना
आधी दूध मंद आचेवर तापवावं. दूध तापलं की मध्यम आचेवर ते उकळू द्यावं. तांदूळ स्वच्छ धुवावेत. दोन तास पाण्यात भिजवावेत. त्यानंतर पाणी काढून टाकून तांदूळ निथळत ठेवावेत. दुधाला भरपूर उकळी फुटली की तांदूळ दुधात घालावेत. तांदूळ घातल्यानंतर मिश्रण सतत हलवत राहावं. एका वाटीत गुळ घ्यावा. त्यात अर्धा कप पाणी घालावं. मंद आचेवर गुळ पाण्यात विरघळून घ्यावा. गूळ पूर्ण विरघळला की गॅस बंद करावा.
दुधात तांदूळ शिजले की आधी त्यात बारीक तुकडे केलेले काजू, बदाम घालावेत. बेदाणे घालावेत. हे घातल्यानंतर खीरीला एक उकळी येवू द्यावी म्हणजे सुकामेवा दुधात नरम होतो. त्यानंतर विरघळून घेतलेला गूळ घालावा. शेवटी वेलची पूड घालून गॅस बंद करावा. नैवेद्यासाठीची ही गुळाची खमंग खीर मन तृप्त करते.
बेसन हलवा
बेसन हलवा करण्यासाठी 1 कप बेसन, एक कप दूध, पाऊण कप साखर, पाऊण कप साजूक तूप, बदाम, पिस्ता आणि खव्यासाठी दोन चमचे दूध पावडर, एक चमचा तूप आणि एक ग्लास दूध घ्यावं.
छायाचित्र: गुगल
बेसनाचा हलवा करताना
आधी हलव्यासाठी लागणारा खवा तयार करुन घ्यावा. खव्यामुळे हलव्याची चव खमंग लागते. हा खवा अगदी कमी वेळात घरीही तयार करता येतो. त्यसाठी एका कढईत एक चमचा तूप घालावं. ते गरम झालं की त्यात एक ग्लास दूध घालावं. दूध थोड्या वेळ उकळू द्यावं. दूध उकळलं की त्यात दूध पावडर घालावी. दूध पावडर घातल्यनंतर मिश्रण सतत ढवळत राहावं. खवा तयार झाला की तो बाजूला ठेवून द्यावा.
दुसर्या कढईत हलव्यासाठी साजूक तूप गरम करायला ठेवावं. तूप हलकं गरम झालं की त्यात बेसन घालावं. मंद आचेवर बेसन सतत परतत रहावं. बेसनाचा रंग सोनेरी होइपर्यंत आणि बेसनाला खमंग वास सुटेपर्यंत बेसन भाजावं. चांगल खरपूस बेसन भाजण्यासाठी 15 मिनिटं वेळ लागतो. बेसन भाजलं गेलं की त्यात साखर घालावी. साखर आणि बेसन चांगलं परतून घ्यावं. दूध घालण्याआधी साखर घातली तर हलव्याला रंग छान येतो आणि तो खमंगही लागतो. बेसनात साखर चांगली मिसळून घेतली की गरम करुन कोमट केलेलं दूध घालावं. तेव्हाच खवा घालावा. खवा घालणार नसल्यास एक कप दूध आणखी घालावं. दूध आणि खवा घातल्यानंतर हलवा सतत हलवत राहावा. हलव्यात गुठळी राहायला नको. दूध हलव्यात पूर्ण शोषलं गेलं की त्यात बारीक तुकडे केलेला सुकामेवा घालावा. सुकामेवा हलव्यात चांगला एकजीव करावा आणि गॅस बंद करुन वेलची पूड घालावी. बेसनाचा हलवा वाटीत घेऊन त्यावर साजूक तूप घालावं. हा नैवेद्य देवास दाखवला की खमंग हलवा खायला तयार.