हिवाळ्यात वाढत्या गारठ्यापासून बचाव करण्यासाठी काही आवश्यक सिझनल पदार्थ खाणे गरजेचे असते. शक्यतो थंडीच्या दिवसांत आपण शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाण्यावर अधिक भर देतो. हिवाळ्यात बाजारांत विकायला ठेवलेले रताळं हे कंदमूळ खाणे आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरु शकते. रताळं हे सगळ्या कंदमुळांपैकी सर्वात पौष्टिक असे बहुगुणी कंदमुळ आहे. बटाट्याप्रमाणे दिसणाऱ्या या कंदमुळांत व्हिटॅमिन 'ए', 'सी' आणि मँगनीज मुबलक प्रमाणांत असते. याचबरोबर, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील फार मोठ्या प्रमाणावर असतात. थंडीच्या दिवसांत येणारं हे कंदमुळं म्हणजे आरोग्यासाठी वरदानच असते(Very easy & perfect way to boil Sweet potato in pressure cooker).
रताळं फक्त उपवासाला खातात असा आपला समज असतो, पण असे नसून एरवीही तुम्ही रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता. यामध्ये रताळ्याची भाजी, रताळ्याचा कीस, गूळ आणि तूपातील रताळ्याच्या गोड फोडी, रताळ्याची खीर असे अनेक पदार्थ करता येतात. परंतु असे अनेक पदार्थ करताना बहुतेकवेळा रताळं आधी उकडवून घ्यावे लागते. परंतु बटाट्याप्रमाणे रताळं देखील कुकरमध्ये पाणी घालून उकडावता येत परंतु अनेकदा रताळं पटकन शिजून त्याचा लगदाच होतो, किंवा पाण्यामुळे ते पचपचीत होते. अशा रताळ्याचा वापर करुन पदार्थ केल्यास ते चवीला चांगले लागत नाहीत. यासाठीच रताळं झटपट उकडवण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करु(Hack to boil sweet potatoes/shakarkandi perfectly).
रताळं उकडवण्याच्या सोप्या भन्नाट ट्रिक्स...
१. कुकरमध्ये पाण्याशिवाय रताळं उकडावा :- आपण कुकरमध्ये पाण्याचा वापर न करता देखील रताळं अगदी ५ मिनिटांत उकडवू शकतो. यासाठी, सर्वात आधी रताळं स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर, कुकरमध्ये चमचाभर तूप घालून त्यात मिनिटभर रताळं परतून घ्यावे. आता एक कॉटनचा स्वच्छ रुमाल घेऊन तो पाण्यांत भिजवून थोडा पिळून घ्यावा. तुपात परतून घेतलेल्या रताळ्यांच्या तुकड्यावर हा कॉटनचा रुमाल घालून मग कुकरचे झाकण लावून १ शिट्टी होऊ द्यावी. त्यानंतर गॅस थोडा मंद आचेवर ठेवून १० मिनिटे मंद आचेवर रताळं उकडवून घ्यावं. कुकर थंड झाल्यावर उघडल्यावर रताळं सुरीच्या मदतीने दाबून पाहावे, रताळं पाण्याशिवाय अगदी व्यवस्थित शिजलेल असेल.
गूळ शेंगदाणे आहेत ना घरात, मग ' असा ' करा हिवाळ्यातील सुपरफूड खाऊ, पौष्टिक आणि स्वस्त भारी...
कांदा चिरताना डोळ्यातून पाण्याच्या धारा? ८ टिप्स, अश्रूचा थेंबही न येता पटकन चिरला जाईल कांदा...
२. कढईत असे शिजवा रताळं :- एक कढई घेऊन ती आधी ५ ते ७ मिनिटे झाकून प्री- हिट करून घ्यावी. रताळ्याचे मध्यम आकाराचे छोटे तुकडे करून घ्यावेत. आता या तुकड्यांना थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्यावे. त्यानंतर या कढईत ते रताळं ठेवून वरुन झाकण ठेवून झाकून घ्यावे. १० मिनिटे गॅस मंद आचेवर ठेवून रताळं शेकून घ्यावे.
३. मिठाचा असा करा वापर :- एका कढईत कपभर मीठ घेऊन ते थोडे गरम होऊ द्यावे. या गरम मिठात रताळ्याचे तुकडे ठेवून त्यावर झाकण ठेवावे. १० मिनिटे झाकण ठेवून रताळं गरम मिठात शेकून घ्यावं. अशा प्रकारे आपण गरम मिठाचा वापर करून देखील रताळं झटपट शेकू शकता.
अशा या तीन सोप्या पद्धतीने आपण रताळं अगदी झटपट उकडवून किंवा भाजून घेऊ शकता. पाण्याचा वापर न करता देखील रताळं अगदी पटकन उकडता येईल.