हादगा किंवा अगस्ता ही रानभाजी कोकण आणि मराठवाड्यात विपूल प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही हादग्याची भाजी उपलब्ध असते. सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या झाडांची फुले, शेंगा अतिशय पौष्टिक असतात. हादग्याच्या पिवळट पांढऱ्या रंगाच्या आकर्षक फुलांचे चवदार रायते बनविणे अतिशय सोपे आहे. तुम्ही तुमच्यासाठी तर ही डीश एकदा बनवाच पण पाहूणे येणार असतील, तेव्हाही हमखास बनवून पहा. हा नविन पण अतिशय चवदार पदार्थ खाऊन पाहूणेही आनंदून जातील.
रायते बनविण्यासाठी लागणारे पदार्थहादग्याची फुले, दही, मीठ, जीरे, मोहरी, तेल, कोथिंबीर, लाल मिरची, चिमुटभर साखर.
कसे बनवायचे हादग्याच्या फुलांचे रायते१. सगळ्यात आधी तर हादग्याची फुले व्यवस्थित निवडून एकदा धुवून घ्या.२. हादग्याची फुले अतिशय नाजूक आणि तलम असतात. त्यामुळे ती वाफवल्यावर अगदीच कमी दिसू लागतात. म्हणून चार ते पाच जणांसाठी रायते बनवायचे असल्यास एखादा कटोरा भरून फुले घ्यावीत.
३. फुले स्वच्छ धुतली की ती तशीच भिजत न ठेवता लगेच कुकरच्या डब्यात टाका. या डब्यात पुन्हा पाणी टाकू नये. फक्त कुकरच्या तळाशी असलेले पाणीच वाफ येण्यासाठी पुरेसे आहे. ४. कुकरची एक शिटी झाली की लगेच गॅस बंद करावा.५. यानंतर कुकर थंड झाल्यावर वाफवलेल्या फुलांमध्ये घट्ट आणि फेटलेले दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर टाकून हे मिश्रण हलवून घ्यावे. यानंतर वरून मोहरी, जीरे, हिंग आणि एखादी वाळलेली लाल मिरची टाकून खमंग फोडणी घातली की झाले रायते तयार..!
आरोग्यासाठीही पोषक आहे हादगा....१. हादग्याच्या फुलांमध्ये आणि शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते. २. कफ आणि वातदोष कमी करण्यासाठी हादग्याच्या फुलांपासून बनविलेले विविध पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.३. मासिक पाळीतील अनियमितता तसेच पाळी संदर्भातील अनेक आजारांवर हादग्याचे पदार्थ खाणे प्रभावी ठरते. ४. भूक न लागणे किंवा पचनाच्या समस्या सोडविण्यासाठीही हादगा खावा.५. हादग्याच्या नियमित सेवनाने जुनाट सर्दीचा त्रासही कमी होतो.६. हवामान बदलामुळे ताप आला असल्यास हादगा गुणकारी ठरतो.