आपल्याला घरात केलेली शिमला मिरची, फ्लॉवर किंवा अन्य कसल्या भाज्या आवडत नाहीत. या भाज्या पाहून आपण अनेकदा नाक मुरडतो. पण याच भाज्या हॉटेलमध्ये आपल्या समोर आल्या तर मात्र आपण त्याच्यावर ताव मारतो. हॉटेलमध्ये गेल्यावर साधारणपणे एकाच प्रकारची ग्रेव्ही असलेली आणि भाज्यांची वेगवेगळे कॉम्बिनेशन असलेल्या या भाज्या आपण जीरा राईस, रोटी किंवा अगदी नुसत्या सुद्धा आवडीने खातो. हॉटेलमधल्या भाजीला असणारी ग्रेव्ही हे त्यामागचे सगळ्यात महत्त्वाचे कारण असते. घरी आपण नेहमी अशा ग्रेव्हीच्या भाज्या करत नाही. पण कधीतरी अशा भाज्या छान लागतात आणि तोंडालाही थोडी चव येते (Handi Kadhai Paneer Recipe).
अशी ग्रेव्हीची भाजी आपण घरी करु म्हटलं तर ती आपल्याला तशी जमतेच असं नाही. यामध्ये वापरण्यात येणारे मसाल्यांचे गणित जमणे सगळ्यात महत्त्वाचे असते. घरी कधी ही भाजी जास्त स्पायसी होते तर कधी त्यात चुकून पाणीच जास्त पडतं. पनीर ही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अतिशय आवडणारी गोष्ट. याच पनीरची हॉटेलसारखी पनीर हंडी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. ही भाजी परफेक्ट हॉटेल किंवा ढाबा स्टाईल होण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया. यामुळे विकेंडच्या जेवणाचा बेत तर फक्कड होईलच पण वेगळी भाजी केल्याने घरातील सगळेच खूश होतील.
१. मातीच्या हंडीत थोडं तेल घेऊन त्यात कांदा आणि शिमला मिरचीचे थोडे मोठ्या आकाराचे तुकडे त्यात परतून घ्यायचे.
२. तळलेला हा कांदा आणि शिमला मिरची एका ताटलीमध्ये बाजूला काढून ठेवायची.
३. त्यानंतर त्याच तेलात कांद्याची पेस्ट घालायची. मग यातच टोमॅटोची पेस्ट आणि २ ते ३ मिरच्या उभ्या चिरुन घालायच्या.
४. यामध्ये मीठ, हळद, तिखट, गोडा मसाला, हंडी मसाला, धणे-जीर पावडर घालायची आणि सगळे चांगले हलवून शिजवून घ्यायचे.
५. यामध्ये पनीर आणि परतलेले कांदा आणि शिमला मिरची घालून सगळे छान एकजीव करायचे.
६. वरुन फ्रेश क्रिम आणि बारीक चिरलेली हिरवी गार कोथिंबीर घालायची आणि ही गरम भाजी फुलके, रोटी किंवा जीराराईस यांच्यासोबत खायला घ्यायची.