भोपळा ही अनेकांची नावडती भाजी असली तरी आरोग्याच्या दृष्टीने भोपळा (healthy bottle gourd) ही सर्वात गुणी भाजी आहे. आपल्या आरोग्याबाबत सजग असणाऱ्यांची, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आवडती भाजी. भोपळा हा बाराही महिने उपलब्ध असल्यानं ही भाजी कधीही खाल्ली तरी फायदेशीर ठरते. भोपळ्याची केवळ भाजीच नाही तर मुटके, थालिपीठ असे खमंग प्रकारही करता येतात. भोपळ्याचे चविष्ट तिखटाचे प्रकार करता येतात तसेच भोपळ्याचे गोड पदार्थही (deserts from bottle gourd) करता येतात. सणावारात नेहेमीच्या गोड पदार्थांना वेगळा पर्याय हवा असल्यास भोपळ्याचा विचार नक्कीच करता येतो. गोडाच्या बाबतीत भोपळ्याचा विचार करणं हे चव आणि आरोग्य या दोन्ही दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. सणावाराला खीर हा प्रकार सर्वात जास्त केला जातो. चविष्ट आणि आरोग्यदायी अशी वेगळी खीर करायची असल्यास भोपळ्याची हरियाली खीर (hariyali Kheer) अवश्य करावी अशी आहे. ही खीर खाल्ल्याने चविष्ट गोडाचा पदार्थ खाण्याची इच्छा तर पूर्ण होतेच सोबतच आरोग्याच्या समस्यांवर (health benefits of hariyali kheer) ही खीर योग्य उपायही ठरते
Image: Google
भाजी/मुटके/ थालिपीठ/ हलवा/ खीर या कोणत्याही स्वरुपात भोपळा खाल्ल्यास त्याचा आरोग्यास फायदा होतो. भोपळ्याच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं हदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो, डोकेदुखी, पोटाशी निगडित समस्यांवर भोपळा फायदेशीर आहे. म्हणूनच वजन, आरोग्य यांचा खूप विचार करत असाल आणि सणावारात गोड खाऊन आरोग्य बिघडेल, वजन वाढेल अशी चिंता सतावत असल्यास भोपळ्याची हरियाली खीर खाण्यास हरकत नाही.
Image: Google
हरियाली खीर कशी करावी?
भोपळ्याची हरियाली खीर करण्यासाठी 1 लिटर गायीचं दूध, अर्धा कप ब्राऊन शुगर (देशी खांड), 2 कप किसलेला भोपळा, वेलची पूड, अर्धा कप सुकामेवा ( काजू, बदाम, बेदाणे एकत्र) आणि 3 चमचे साजूक तूप घ्यावं. हरियाली खीर करताना सर्वात आधी काजू, बदामाचे बारीक तुकडे करावेत किंवा ते एकत्र कुटून घ्यावेत. भोपळा धुवून किसून घ्यावा. भोपळ्याच्या किस पिळून पाणी काढून घ्यावं. कढईत तूप गरम करुन त्यात भोपळ्याचा किस परतून घ्यावा. परतताना त्याचा रंग बदलला की त्यात दूध घालून मंद आचेवर मिश्रण उकळू द्यावं. मिश्रणाला 2-3 उकळ्या फुटल्या की त्यात ब्राऊन शुगर आणि सुका मेवा घालून मिश्रण हलवून घ्यावं. दूध घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालून दूध आणखी आटू द्यावं. दूध आटलं की गॅस बंद करावा.
Image: Google
भोपळ्याच्या या हरियाली खिरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. यात गायीचं लो फॅट दूध वापरल्यानं ही खीर वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. हाडं आणि दातांच्या आरोग्यासाठी हरियाली खीर फायदेशीर असते. पोटदुखी, ॲसिडिटी या पोटाशी निगडित समस्यांवर हरियाली खीर उपयुक्त ठरते. हरियाली खीर करताना यात वापरल्या जाणाऱ्या सुक्या मेव्यामुळे या खिरीतून ई, बी 6 ही जीवनसत्वं, झिंक, लोह, तांबं, सेलिनियम, पोटॅशियम ही खनिजंही मिळतात. हरियाली खीर करताना गोडव्यासाठी ब्राऊन शुगर वापरल्यानं संधिवातावर ही खीर उपयुक्त ठरते. तसेच फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं हरियाली खीर खाऊन वजन वाढत नाही, उलट संतुलित राहातं.