Lokmat Sakhi >Food > हरतालिकेचा उपवास, मग करा उपवासाचे हे चविष्ट , पचायला हलके पदार्थ! उपवास होईल सुखाचा.

हरतालिकेचा उपवास, मग करा उपवासाचे हे चविष्ट , पचायला हलके पदार्थ! उपवास होईल सुखाचा.

हरतालिकेचा कडकडीत उपवास . काहीबाही खाऊन उपवास कशाला करा? हलक्या फुलक्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचं नियोजन आधीच करुन ठेवा. त्यासाठीचे हे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 02:48 PM2021-09-08T14:48:26+5:302021-09-08T14:59:56+5:30

हरतालिकेचा कडकडीत उपवास . काहीबाही खाऊन उपवास कशाला करा? हलक्या फुलक्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचं नियोजन आधीच करुन ठेवा. त्यासाठीचे हे पर्याय

Hartalika Vrat- Make these delicious and nutritional food for Hartalika fasting | हरतालिकेचा उपवास, मग करा उपवासाचे हे चविष्ट , पचायला हलके पदार्थ! उपवास होईल सुखाचा.

हरतालिकेचा उपवास, मग करा उपवासाचे हे चविष्ट , पचायला हलके पदार्थ! उपवास होईल सुखाचा.

Highlightsजे या उपवासाला केवळ गोडाचे पदार्थ खातात त्यांनी भगर अननसाचा भात, भगर शिरा, खजूर खसखस खीर, पियूष यापैकी कोणताही पदार्थ खाल्ला तरी पोटभरीचा आणि पौष्टिक ठरतो.कुट्टुच्या पिठाचे पातळसर धिरडे काकडी दह्याच्या कोशिंबीरीसोबत उत्तम लागतात.मिश्र  फळांची कोशिंबीर ही या उपवासासाठी उत्तम. पण सर्व फळं आणि त्यातली सामग्री  आयत्यावेळी एकत्र करावी.

 - राजश्री  शिन्दोरे

 उद्या हरतालिका. अनेक महिला या दिवशी अगदी कडक उपवास करतात. उपवासाचं खाल्लं तरी हलकं फुलकं आणि मर्यादित प्रमाणातच असेल याची काळजी घेतली जाते. अनेकजणी तर तिखट मिठाचे पदार्थ न खाता गोड पदार्थ खातात. कडक उपवास असला आणि हलकं फुलकं खायचं असलं तरी हरतालिका उपवासाच्या दिवशी आहाराची काळजी घ्यायला हवी. काहीबाही खाऊन उपवास निभावून नेला जातो आणि दुसर्‍या दिवशी अशक्तपणा, अँसिडिटी असे त्रास होतात. तसं होवू नये म्हणून या उपवासाच्या आहाराचं नियोजन आदल्या दिवशीच करुन ठेवावं. जे खायचं ते जास्तीत जास्त पौष्टिक आणि पोटभरीचं कसं असेल याकडे लक्ष द्यायला  हवं. म्हणजे उपवासाच्या दिवशी शरीर आणि मन उत्साही राहील आणि काम करण्याची ऊर्जा मिळेल.
हरतालिका उपवासाला काय खाता येईल याचं नियोजन करायला सोपं जावं म्हणून हे काही तिखट-मीठ आणि गोडाचे पदार्थ.

छायाचित्र- गुगल

भगरीचा अननस भात

भगरीचा अननस भात करण्यासाठी 2 वाट्या भगर, 4 वाट्या ताज्या अननसाच्या फोडी, 1 वाटी साखर, 4 लवंगा, 4-5 वेलची, केशर काड्या, अर्धी वाटी दूध आणि 4 चमचे साजूक तूप घ्यावं.
हा भात करताना भगर धुवून ठेवावी. केशर काड्या दुधात भिजत घालाव्यात. 4 वाट्या पाणी घेऊन ते उकळावं. उकळी आली की धुतलेली भगर मोकळी शिजून घ्यावी. दुसरीकडे अननसाच्या फोडी वाफवून घ्याव्यात. जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून त्यात लवंगा, वेलची फोडणीस घालून त्यात शिजवलेली भगर, साखर आणि शिजवलेलं अननस असं क्रमानं घालावं. हे सर्व चांगलं परतून घेतलं की झाकण ठेवून भाताला दणदणीत वाफ आणावी.

भगरीचा शिरा

हा शिरा करण्यासाठी एक वाटी भगर, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप, बदामाचे काप, बेदाणे आणि वेलची पूड घ्यावी.
शिरा करताना आधी बदामाचे पातळ काप करावेत. भगर तुपावर खमंग भाजावी. भगरीच्या दुप्पट पाणी गरम करुन घालावं. मिश्रणाला उकळी आली की त्यात साखर घालावी. झाकण ठेवून पाणी आटू द्यावं आणि वाफ काढावी. शेवटी वेलची पूड, बदामाचे काप घालून शिरा पुन्हा हलवून घ्यावा.

उपवासाची मसाला इडली

उपवासाची इडली करण्यासाठी 2 वाट्या भगर, 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ, मिरची, आलं घ्यावं.
इडली करतान आधी भगर आणि साबुदाणा रात्रभर वेगवेगळा भिजत घालावा. सकाळी दोन्ही वेगळे वाटून मग ते एकत्र करावेत. हे पीठ आंबवावं आणि संध्याकाळी त्यात मिरची आल्याचं वाटण, मीठ, दाण्याचा कूट घालून मिश्रण चांगल घोटून इडलीपात्रात घालून इडल्या कराव्यात.

छायाचित्र- गुगल

दूध पनीर कुट्टू धिरडं

हा पदार्थ मध्यप्रदेशात हरतालिकेच्या उपवासाला म्हणून केला जातो. या धिरड्यासाठी एक वाटी कुट्टूचं किंवा शिंगाडा पीठ, चवीनुसार मिरची, आलं पेस्ट, मीठ, अर्धी वाटी किसलेलं पनीर, कोथिंबीर, गरजेप्रमाणे दूध , तेल किंवा तूप घ्यावं.
धिरडे करताना सर्व साहित्य एकत्र करुन भज्याच्या पिठापेक्षा जरा पातळ पीठ तयार करावं. तव्यावर तूप/ तेल घालून मिश्रण पसरवून पातळ धिरडी करावी. धिरडी दोन्ही बाजुने तुपावर किंवा तेलावर भाजावीत. यासोबत काकडीची दही घालून कोशिंबीर करावी.

मिश्र फळांची कोशिंबीर

ही उपवास स्पेशल कोशिंबीर करण्यासाठी 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 1 वाटी सफरचंदाचे काप, 1 वाटी अननसाचे तुकडे, 2वाटी मलईचं दही, साखर, 2 छोटे चमचे जिरे पूड आणि चवीनुसार मीठ एवढं जिन्नस घ्यावं.
कोशिंबीर करताना वरील सर्व साहित्य आयत्यावेळी एकत्र करुन कोशिंबीर करावी आणि ती लगेच संपवावी. फळं खूप वेळ एकत्र करु नये. कोशिंबीर उरली म्हणून फ्रीजमधे ठेवून नंतरही खाऊ नये.

रताळ्याची भाजी आणि कुट्टुची पोळी

भाजीसाठी अर्धा किलो रताळी, 5-6 हिरव्या मिरच्या, जिरे, 2 चमचे तूप, मीठ, 1 वाटी आंबट दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
रताळी धुवून सालं काढून त्याच्या भाजीच्या बेतानं फोडी कराव्यात. कढईत तूप घालून ते गरम होवू द्यावं. त्यात जिरे, मिरच्यांचे तुकडे घालून परतून घ्यावेत. झाकण ठेवून रताळ्याच्या फोडींना वाफ काढावी. फोडी चांगल्या शिजल्या की त्यावर दही घालून ते चांगलं मिक्स करुन घ्यावं. गरजेप्रमाणे पाणी घालून भाजी थोडी सैलसर ठेवावी. भाजी पूर्ण शिजली की त्यात कोथिंबीर चिरुन घालावीत.
कुट्टूच्या पोळ्यांसाठी 1 वाटी कुट्टू किंवा शिगाडा पीठ घ्यावं. पिठात चवीपुरतं मीठ घालावं. एक चमचा तुपाचं मोहन घालून पीठ चांगलं मळून घ्यावं. थोडया वेळानं पीठ मऊ करुन त्याच्या पोळ्या कराव्यात. ही पोळी रताळ्याच्या भाजीसोबत खावी.

छायाचित्र- गुगल

खजूर खसखशीची खीर

ही खीर करण्यासाठी अर्धा लिटर दूध, 50 ग्रॅम बिया काढलेले खजूर, चवीपुरता गूळ किंवा साखर, 2-3 चमचे खसखस घ्यावी.
खसखस कोमट पाण्यात किंवा दुधात 3 तास भिजत घालावी. मग बारीक वाटून घ्यावी. खजूर बारीक चिरुन घ्यावेत. कमी पाणी टाकून खजूर शिजवून घ्यावेत. वाटलेली खसखस दुधात घालून शिजवावी. खसखस 15 मिनिटं मंद आचेवर शिजल्यावर त्यात शिजलेला खजूर, गूळ किंवा साखर घालावी. चारोळ्या आणि बदामाचे काप घालून गॅस लगेच बंद करावा.

पौष्टिक पियूष

पियूष तयार करण्यासाठी अर्धी वाटी र्शीखंड, 2 वाटी गोडसर ताक, 1 वाटी दूध आणि गरजेप्रमाणे साखर किंवा गूळ घ्यावा.
पियूष तयार करताना वरील सर्व साहित्य कत्र करुन मिक्सरवर फिरवावं. गरज वाटल्यास ते थंडं करण्यासाठी त्यात थोडा बर्फ घालावा.

( लेखिका नाशिकस्थित असून त्या पाककला, हस्तकला आणि  गृहसजावटीच्या वस्तू तयार करण्यात कुशल आहेत.)

Web Title: Hartalika Vrat- Make these delicious and nutritional food for Hartalika fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.