Lokmat Sakhi >Food > ब्रेकफास्ट करा पोटभर; सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या ५ हेल्दी - चविष्ट रेसिपी

ब्रेकफास्ट करा पोटभर; सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या ५ हेल्दी - चविष्ट रेसिपी

दिवसाची सुरुवात पोटभरीच्या आणि पौष्टीक पदार्थांनी व्हायला हवी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 11:28 AM2022-01-02T11:28:37+5:302022-01-02T11:31:52+5:30

दिवसाची सुरुवात पोटभरीच्या आणि पौष्टीक पदार्थांनी व्हायला हवी....

Have breakfast 5 Healthy Tasteful Recipes | ब्रेकफास्ट करा पोटभर; सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या ५ हेल्दी - चविष्ट रेसिपी

ब्रेकफास्ट करा पोटभर; सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या ५ हेल्दी - चविष्ट रेसिपी

Highlightsरोज रोज वेगळा नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी उत्तम पर्यायसकाळी घाईच्या वेळी पटकन होईल आणि सगळ्यांना आवडतील असे पदार्थ

सकाळी उठल्यावर पोट साफ होते आणि आंघोळ वगैरे आवरुन झाले की आपल्याला दणकून भूक लागते. रात्रभर पोट रिकामे असल्याने पोटात जणू खड्डाच पडलेला असतो. एकीकडे ऑफीसला जायची घाई, स्वयंपाकाची घाई आणि त्यात घरातील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा. कितीही घाई असली तरी ब्रेकफास्ट मात्र करायलाच हवा. सकाळी एकदा नीट पोट भरलेले असले की कामाला सुरुवात करता येते. आता रोज उठून ब्रेकफास्टला काय करायचे असा प्रश्न प्रत्येकीला पडतो. सतत पोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी करुन आणि खाऊन अनेकदा कंटाळा येतो. मग झटपट होईल आणि तरीही हेल्दी असतील असे कोणते पदार्थ करता येतील पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. हिरव्या मूगाचे डोसे 

हिरवे मूग आदल्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री झोपताना हे मूग लसूण आणि मिरची घालून मिक्सरमधून वाटून ठेवा. सकाळी उठल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून त्याचे डोसे घाला. हे डोसे अतिशय हेल्दी असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. हे डोसे दही, सॉस, चटणी अशा कशासोबतही छान लागतात. 

२. गव्हाचा दलिया

बाजारात अर्धवट दळलेले गहू मिळतात. याला आपण दलियाही म्हणतो. या दलियाची दूध आणि गूळ घातलेली खीर आपल्याला माहित आहे. पण सकाळी सकाळी गोड नको वाटते त्यामुळे भाज्या घालून उपम्यासारखा दलिया केल्यास पोटभर आणि हेल्दी होतो. घरात उपलब्ध असतील त्या भाज्या म्हणजे गाजर, मटार, फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, कोबी, फरसबी अशा कोणत्याही भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. दलिया कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवून घ्यावा. फोडणीत कडीपत्ता, बारीक चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढून घ्यावी. त्यामध्ये दलिया घालून आवडीनुसार तिखट, मसाला, धनेजीरे पावडर, मीठ घालावे. पुन्हा व्यवस्थित वाफ आणून शेवटी वरुन कोथिंबीर घालावी. हा दलिया खायला अतिशय चविष्ट तर लागतोच पण भाज्या आणि गहू असल्याने हेल्दी होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

३. रव्याचा ढोकळा 

रव्याचा शिरा किंवा उपमा आपण नेहमीच करतो. पण रव्याचा ढोकळा हा आगळावेगळा आणि झटपट होणारा पदार्थ तुम्ही ब्रेकफास्टसाठी नक्की ट्राय करु शकता. रव्यामध्ये दही, थोडासा सोडा, आलं मिरची पेस्ट, मीठ, चवीपुरती साखर घालून हे मिश्रण चांगले भिजवून घ्यावे. अर्धा ते पाऊण तास भिजल्यावर कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे पीठ घालून १५ मिनिटे शिट्टी न लावता नुसत्या वाफेवर कुकरमध्ये ठेवावे. गार झाल्यावर ढोकळा कापून काढावा. अतिशय लुसलुशीत ढोकळा डीशमध्ये घेतल्यावर वरुन हिंग जीऱ्याची फोडणी आणि कोथिंबीर घालावी. आवडत असेल तर खोवलेले नारळ घातल्यास उत्तम. हा ढोकळा नुसताही छान लागतो पण सोबत सॉस किंवा तळलेली हिरवी मिरची असेल तरी त्याचा वेगळी चव येते. 

४. तांदळाच्या पीठाची उकड 

तांदळाच्या पीठात दही, मीठ, साखर आणि पाणी घालून ते एकजीव करावे. पीठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. फोडणीत कडीपत्ता, मिरची घालून हे एकजीव केलेले पीठ घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. डीशमध्ये घेतल्यानंतर तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन घालावी. तांदूळ आणि दही दोन्हीही आरोग्यासाठी चांगले असल्याने हेल्दी नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

५. मिक्स पीठांचे थालिपीठ 

आपण भाजणीचे थालिपीठ नियमित करतो पण भाजणी संपली असेल की काय करायचे आपल्याला कळत नाही. अशावेळी आपल्या घरात साधारणपणे ज्वारीचे पीठ, बेसन, गव्हाचे पीठ ही पीठे असतातच. ही सगळी पीठे एकत्र करावीर. नाचणी, मका, बाजरी यांसारखी इतर पीठे घातल्यासही चालते. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, भरपूर कोथिंबीर, धनेजीरे पावडर, तिखट आणि मीठ घालून हे पीठ घट्ट भिजवून घ्यावे. तव्यावर तेल घालून थालिपीठ थापावे आणि गरमागरम थालिपीठ तूप, दही यांसोबत खायला द्यावे. हा नाश्त्याचा दमदमीत पर्याय असून सगळ्या धान्यांची पीठे असल्याने हेल्दीही आहे.  

 

Web Title: Have breakfast 5 Healthy Tasteful Recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.