उन्हाळ्यात जेवणात रायते, कोशिंबीर खाणं आरोग्यदायी असतं. शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी, शरीराला आतून थंडावा मिळण्यासाठी रायते खाण्याला महत्व आहे. जेवणात विविध प्रकारचे रायते करता येते. जवसाचे रायते हा रायत्याचा चविष्ट आणि पौष्टिक प्रकार आहे. शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले जवसाचे रायते खाल्ल्यानं मूडही सुधारतो. डोळ्यांच्या आणि हदयाच्या आरोग्यासाठी जवसाचं रायतं फायदेशीर असतं. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी , वजन कमी करण्यासाठी जेवणात जवसाचे रायते खाण्याचा सल्ला दिला जातो. जवसामध्ये ब 1 हे जीवनसत्व, प्रथिनं, तांबं, मॅग्नीज, ओमेगा 3 हे पोषक घटक असतात. जवसातल्या गुणधर्मांचा फायदा जवसाचे रायते खाल्ल्यानं आरोग्यास मिळतात.
Image: Google
का खावे जवसाचे रायते?
1. जवसाचे रायते पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जवसामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. तसंच जवस आणि दही या मिश्रणामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. यातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात रायते खाणे फायदेशीर ठरते.
2. जवसाचे रायते खाल्ल्यानं पोटात ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड जातं. या पोषक घटकामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
3. जवसाचे रायते खाल्ल्यानं रक्तातील कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित राहातं. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहातो. जवसाचे रायते खाल्ल्यानं हदयाचं, रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुरक्षित राहातं.
4. जवासामध्ये जीवनसत्वं आणि प्रथिनं मोठ्या प्रमाणावर असतात. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी , दृष्टी सुधारण्यासाठी जवसाच्या रायत्याचा उपयोग होतो.
Image: Google
जवसाचे रायते कसे करावे ?
जवसाचे रायते करण्यासाठी थोडे जवस एका वाटीत एक तास भिजवावे. दुसऱ्या वाटीत दही घ्यावं. त्यात थोडी मिरेपूड, भाजेलेल्या जिऱ्यांची पूड्फ आणि मीठ घालून दही चांगलं फेटून घ्यावं. थोड्या वेळानं फेटलेल्या दह्यात भिजवलेले जवस घालून ते चांगले मिसळून घ्यावे. वरुन कोथिंबीर आणि पुदिना चिरुन घालावा.
Image: Google
जवसाचे रायते करण्याचा दुसरा प्रकारही आहे. या रायत्यामध्ये बुंदी घालूब जवसाचे बुंदी रायते करता येते. या प्रकारचे जवसाचे रायते करण्यासाठी थोडे जवस आधी पाण्यात भिजत घालावेत. या रायत्यासाठीची बुंदी घरी करता येते किंवा विकतची बुंदी वापरली तरी चालते. घरची ताजी बुंदी वापरल्यास रायते खमंग होते. घरी बुंदी करताना बेसनात थोडा ओवा, मीठ घालून बेसन पाण्यानं भिजवून घ्यावं. मिश्रण झाऱ्यावर घासून बुंदी पाडून ती तळून घ्यावी. दह्यामध्ये भिजवलेले जवस घालावे. ते चांगले मिसळल्यावर त्यात जिरे पुड, मिरपूड घालून मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. नंतर त्यात बुंदी घालून रायते चांगले मिसळून फ्रीजमध्ये गार करुन खावे.