कढी हा पदार्थ कोणाला आवडत नाही, ताक आणि बेसनापासून बनवलेला हा पदार्थ चवीला उत्तम, काहीशी आंबट चव देते. प्रत्येक घरात कढी हा पदार्थ विविध पद्धतीने बनवला जातो. काही लोकं पकोडा कढी बनवतात. जी चवीला उत्कृष्ट लागते. आपण कढी कोणत्याही ऋतूत खाऊ शकतो. मात्र, ताका व्यतिरिक्त आपण कधी टोमॅटोपासून तयार कढी खाल्ली आहे का ? सहसा टोमॅटोचा वापर फोडणीत, भाजीत अथवा राईजमध्ये केला जातो. टोमॅटोमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आज आपण टोमॅटोची कढी या पदार्थाची कृती पाहणार आहोत. ही रेसिपी बनवायला सोपी आणि चविष्ट लागते. आपण टोमॅटो कढी चपाती किंवा भातासह देखील खाऊ शकता.
टोमॅटो कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
टोमॅटो
बेसन
जिरं - मोहरी
धणे पावडर
हळद
बारीक चिरलेली कोथिंबीर
आलं
हिंग
कढीपत्ता
तेल
चवीनुसार मीठ
कृती
टोमॅटो कढी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो चांगले धुवून घ्या. त्यानंतर त्याचे चौकोनी मोठे काप करून मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं आणि हिंग टाका. त्यानंतर हळद, बारीक चिरलेलं आलं, धणे पावडर, आणि कढीपत्ता टाकून सगळे मसाले चांगले भाजून घ्या.
मसाले चांगले भाजून झाल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट टाका. आणि चमच्याने चांगले ढवळून घ्या. सगळे मसाले टोमॅटोच्या पेस्टमध्ये मिक्स झाल्यानंतर झाकण ठेऊन एक उकळी येऊ द्या. टोमॅटोच्या मिश्रणाला उकळी येऊपर्यंत दुसरीकडे एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात दिड कप पाणी टाकून पेस्ट तयार करा.
पेस्ट तयार झाल्यानंतर ते टोमॅटोच्या मिश्रणात टाकून मिक्स करा. चमच्याने चांगले ढवळत राहा. आपल्या आवडीनुसार त्यात पाणी मिक्स करा. जर कढीमध्ये घट्टपणा हवा असल्यास त्यात पाणी मिक्स करू नका. एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. शेवटी कढीवर कोथिंबीर टाका. अशाप्रकारे हटके टोमॅटो कढी खायला रेडी.