कैर्यांचा हंगाम आता लवकरच संपेल तेव्हा कैरीचे जे पदार्थ करुन खायचे असतील ते लगेच करुन खा. कैरीचं लोणचं, साखरआंबा, मेथांबा, गुळांबा, छुंदा, चटणी, कैरी डाळ, चटणी असे अनेक पदार्थ आपण आवडीने करतो आणि खातो. पण कैरीची खीरही करता येते हे माहिती आहे? का? आंबट कैरीची गोड खीर. कशी शक्य आहे? फाटणार नाही का? असे प्रश्न पडतीलच. पण आंबट कैरीची गोड खीर करणं शक्य आहे, ती होतेही पटकन, लागतेही छान आणि फाटतही नाही.
ही खीर करण्यासाठी चार कैर्या किसून, एक कप साखर, अर्धा लिटर दूध, अर्धा लिटर कंडेंस्ड मिल्क, अर्धा चमचा वेलची पूड, थोडं केशर, थोडे बदाम काजूचे तुकडे आणि बेदाणे एवढीच सामग्री लागते.
कैरीची खीर कशी करणार?
सर्वात आधी कैर्या धुवून, पुसून , किसून घ्याव्यात. कैरीचा किस चार पाच वेळा पाण्याने चांगला धुवून घ्यावा. कढईत दोन कप पाणी घ्यावं. त्यात पाण्यात धुतलेला कैरीचा किस टाकावा. हा किस पाण्यात पाच मिनिटं उकळू द्यावा. किस नरम झाला की गॅस बंद करावा. आता हे मिश्रण सुती कापडाने गाळून घ्यावा. गाळून घेतलेला हा कैरी गर बाजूला ठेवावा. आता एका भांड्यात दूध गरम करावं. दूध उकळून आटू द्यावं. दूध आटून निम्म्यापेक्षाही कमी झालं की त्यात साखर, कंडेन्स्ड मिल्क, वेलची पावडर आणि केशर टाकून थोड्या वेळ उकळू द्यावं. नंतर त्यात कैरीचा गर टाकून तो पाच मिनिट दुधात शिजू द्यावा. गार झाल्यावर त्यात , काजू, बदाम आणि बेदाणे घालून खीर छान ढवळुन घ्यावी.