Join us  

लोणचं खाण्याचे 5 फायदे, प्रमाणात खा चटकमटक लोणचं- तबियत खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 2:01 PM

लोणच्याच्या चटपटीत चवीमुळे ते केवळ जिभेची रसना पुरवतात असाच समज रुढ आहे. पण लोणचं खाण्याचे आरोग्यासाठी (health benefits of eating pickle) फायदेही आहेत,ते कोणते?

ठळक मुद्देजेवणात लोणचं असल्यास भूक वाढते. पचन सुधारण्यास लोणच्याची मदत होते. लोणचं खाल्ल्यानं शरीरास पोषक मुल्यं देखील मिळतात. 

आपल्या भारतीयांच्या जेवणाच्या ताटात  डाव्या बाजूला जिभेच्या चटक मटक चवीची विशेष काळजी घेण्यासाठी चटणी, लोणचं, कोशिंबीर केली जाते. या सर्वांमध्ये विशेष प्रेम असतं ते लोणच्यावर. गोड- आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवीच्या लोणच्यांचे कितीतरी प्रकार आहेत. आपल्याकडे लोणचं  (pickle) म्हटलं की फक्त कैरीचं आणि लिंबाचंच नसतं तर कैरी, लिंबू यासोबतच मिरची, ओली हळद, फणसाच्या आठळ्यांचं, विविध भाज्यांचं, आवळा, बोरं, करवंद या सर्वांची चटकमटक लोणची केली जातात. लोणच्याच्या चटपटीत चवीमुळे ते केवळ जिभेची रसना पुरवतात असाच समज रुढ आहे. पण लोणचं खाण्याचे आरोग्यासाठी फायदेही (health benefits of eating pickle)  आहेत, ते कसे याबाबत आयुर्वेदिक डाॅक्टर अपर्णा पद्मनाभन यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. तसेच लोणचं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी ते खाताना काय काळजी घ्यायला हवी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. 

Image: Google

लोणचं खाण्याचे फायदे काय?

1. जेवणात कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं समाविष्ट केल्यास तोंडात लाळ जास्त स्त्रवते, भूक वाढते. जेवण चांगलं जाण्यासाठी लोणचं खाणं फायदेशीर आहे. 

2. मधुमेही रुग्णांसाठीही लोणचं खाणं फायदेशीर असतं. मधुमेही रुग्णांनी रोज लोणचं न खाता आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच लोणचं खावं. मधुमेही रुग्णांनी आवळ्याचं लोणचं खाणं जास्त फायदेशीर ठरतं. 

3. मुरवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक नावाचे चांगले जिवाणू असतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी ते महत्वाचे असतात. कैरीच्या लोणच्यात प्रोबायोटिक्स हे चांगले जिवाणू भरपूर असतात. बाहेरच्या विषाणूंसोबत लढण्यास हे प्रोबायोटिक्स मदत करतात. 

4. वजन कमी करण्यासाठी लोणचं खाणं फायदेशीर ठरतं. कारण लोणच्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. लोणच्यामध्ये समाविष्ट मसाले शरीरातील फॅटस कमी करायला मदत करतात. 

Image: Google

5. लोणच्यामध्ये के जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असतं. तसेच लोणच्यामध्ये ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं.  ते शरीराचं मुक्त मुलकांपासून संरक्षण करण्याचं काम करतात. 

6. लोणचं खाल्ल्यानं चयापचय क्रिया सुधारते. गतिमान होते. लोणच्यातील फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते.

7. गरोदर स्त्रियांना लोणचं खाण्यची हमखास इच्छा होते. ती त्यांनी अजिबात दाबून टाकू नये. गरोदर स्त्रियांनी प्रमाणात कैरीचं अथवा लिंबाचं लोणचं खाल्ल्यास गरोदरपणात सकाळी जाणवणारा अशक्तपणा कमी होतो. 

8. कैरीच्या लोणच्यात अ, क, के या जीवनसत्वांबरोबरच कॅल्शियम आणि लोहाचं प्रमाण भरपू असतं. त्यामुळे लोणचं खाल्ल्यानं शरीराला पोषण मुल्यं मिळतात. 

Image: Google

लोणचं खाताना..

1. छातीत पोटत जळजळ होण्याचा त्रास होत असल्यास, कोरडेपणा वाटत असल्यास लोणचं खाणं टाळावं.

2.ऑलर्जी, त्वचा विकार असल्यास लोणचं खाऊ नये. पाळीच्या दिवसात लोणचं खाऊ नये. 

3. कडक उन्हाळ्यात किंवा खूप गरम होत असल्यास  कैरीचं लोणचं खाणं टाळावं. यामुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांची समस्या निर्माण होते. 

4. कोणतंही लोणचं काचेच्या, मातीच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यात ठेवावं. प्लास्टिक बरण्यांमध्ये , धातुच्या डब्यामध्ये ठेवू नये.  

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना