Join us  

भाज्यांचा स्वाद वाढवणारा गरम मसाला आरोग्यासाठीही फायदेशीर! गरम मसाला आहारात असण्याचे 5 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 6:18 PM

भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा गरम मसाला (Garam Masala) हा फक्त स्वाद आणि रंगासाठीच नसतो तर गरम मसाल्याचा उपयोग (Benefits of garam masala) आरोग्यासाठीही होत असतो. स्वयंपाकातील गरम मसाल्याच्या वापरामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या (health benefits of garam masala) सहज सुटतात. 

ठळक मुद्देस्वयंपाकातील गरम मसाल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. गरम मसाल्यात झिंकचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी गरम मसाल्याचा उपयोग होतो. 

इतर कोणत्याही देशातील पदार्थांपेक्षा भारतीय पदार्थांची चव वेगळी आणि विशेष लागते ती त्यातील मसाल्यांच्या वापरामुळे. भारतीय पदार्थात स्वादासाठी कृत्रिम स्वाद न वापरता नैसर्गिक खड्या मसाल्यांचा वापर केला जातो. हेच खडे मसाले विशिष्ट प्रमाणात घेऊन भाजून एकत्र करुन वाटल्यास त्याचा गरम मसला (Garam Masala)  तयार होतो. हा गरम मसाला साध्या खिचडीपासून बिर्याणी पर्यंत सर्व मसालेदार पदार्थांना विशिष्ट चव आणि रंग आणतात. भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा गरम मसाला हा फक्त स्वाद आणि रंगासाठीच नसतो तर गरम मसाल्याचा उपयोग आरोग्यासाठीही (health benefits of garam masala)  होत असतो. गरम मसाल्यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून चयापचय क्रिया सुधारण्याची क्षमता असते. त्यामुळेच गरम मसाल्याचे आरोग्यदायी फायदे समजून घेतल्यास त्याचा जास्त डोळसपणे वापर करता येईल हे नक्की!

Image: Google

गरम मसाल्याचे आरोग्यदायी फायदे

1. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी गरम मसाला फायदेशीर असतो. गरम मसाला तयार करण्यासठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्याच्या जिन्नसमध्ये जिरे आणि दालचिनी या मसाल्यांचा वापर केलेला असतो. जिरे आणि दालचिनी या मसाल्यात मधुमेहविरोधी घटक असतात. हे घटक रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम करतात. 

2. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला डिटाॅक्सिफिकेशन असं म्हटलं जातं. गरम मसाल्यातील दालचिनी ही नैसर्गिक डिटाॅक्स सारखं काम करते हे अभ्यासाद्वारे सिध्द झालं आहे. म्हणूनच स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या गरम मसाल्यामुळे शरीरातील विषारी घटकही बाहेर पडतात. 

3. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वयंपाक करताना गरम मसाल्याचा वापर करावा. गरम मसाला करताना धणे वापरले जातात. धण्यांमध्ये झिंक हा घटक असतो. झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्वयंपाकातील गरम मसाल्यांच्या वापरामुळे शरीरात रोगांशी लढण्याची ताकद निर्माण होते. 

Image: Google

4. डोळे निरोगी राखण्यासाठी गरम मसाला फायदेशीर ठरतो. गरम मसाल्यातील दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात फोलेट असतं. यावर झालेला अभ्यास सांगतो की डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी , डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी फोलेटचं सेवन महत्वाचं मानलं जातं. 

5. शरीरावरील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी गरम मसाल्याचा उपयोग होतो. गरम मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच मसाल्याच्या जिन्नसमध्ये सूज आणि दाहविरोधी घटक असतात. आपल्या नियमित आहारात गरम मसाला असल्यास त्याचा फायदा शरीरावरील सूज आणि वेदना कमी होण्यास होतो. गरम मसाल्याचे हे फायदे वाचल्यास स्वयंपाकात थोडा का होईना गरम मसाला आवर्जून वापरण्याची गरज वाटेल हे नक्की!

टॅग्स :अन्नआहार योजनाआरोग्य