Join us  

फणसाचे गोड रसाळ गरे खाण्याचे ३ फायदे! काटेरी फणसाची जादू, गरे वर्षभर तब्येतीला बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:54 AM

Health Benefits of having Jackfruit Diet Tips : फणसाचा सिझन खूप कमी काळापुरता असतो, पण आरोग्यासाठी हे गरे अतिशय फायदेशीर असतात.

आंब्याचा सिझन संपत आला की बाजारात फणस, करवंद, जांभूळ ही इतर फळं दिसायला लागतात. रानमेवा प्रकारात मोडणारी अनेक फळं आपण खातोच असं नाही. पण कोकणचा मेवा म्हणून ओळखला जाणारा फणस या काळात आवर्जून खायला हवा. कापायला काहीसा किचकट असल्याने आपण थेट फणस आणणे काहीवेळा टाळतो. मात्र बाजारात या फणसाचे गरे अगदी सहज उपलब्ध असतात (Health Benefits of having Jackfruit Diet Tips).

गेल्या काही वर्षात या फणसाच्या गऱ्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून अगदी ६० ते ७० रुपये पाव असा भाव हे गरे खाऊन जात आहेत. फणसाचा सिझन खूप कमी काळापुरता असतो, पण आरोग्यासाठी हे गरे अतिशय फायदेशीर असतात. फणसाचे गरेच नाही तर त्याच्या बिया म्हणजेच आठळ्याही आरोग्यासाठी उपयुक्त असतात. कोकणी पद्धतीची फणसाची भाजीही फारच छान लागते. असा हा फणस या काळात खाण्याचे फायदे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ सांगतात. 

(Image : Google)

१. सध्या आपण सगळेच डिजिटल युगात वावरत असल्याने दिवसाचे ८ ते १० तास आपण स्क्रीनसमोर असतो. यात मोबाइल, लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटर, टिव्ही अशा विविध प्रकारच्या स्क्रीनचा समावेश असतो. फणसात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यातील रेटीना खराब होऊ नये म्हणून त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच भविष्यात होणाऱ्या मोतीबिंदूपासून संरक्षण होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. 

२. थायरॉईड हार्मोन्सचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणारे तांबे फणसात चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही हायपोथायरॉईडिझम किंवा हायपरथायरॉईडिझम सारख्या समस्यांचा सामना करत असाल तर रोजच्या आहारात या फळाचा आवर्जून समावेश करायला हवा. 

३. फणसाच्या गऱ्यांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतो. हाडांची ताकद वाढण्यासाठी हा कॅल्शियम अतिशय गरजेचा असतो. तसेच यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असल्याने किडनीतून कॅल्शियम बाहेर जाण्याचे प्रमाण नियंत्रणात येते. गर्भधारणेच्या दरम्यान किंवा मेनोपॉजमध्ये आपल्याला कॅल्शियमची सर्वाधिक आवश्यकता असते, अशावेळी गरे आवर्जून खायला हवेत. 

टॅग्स :अन्नफळे