जेवणाचं ताट वाढलं जातं तेव्हा सर्वात आधी वाढली जाते चटणी. जेवणात चटणीचं प्रमाण अगदी थोडंच असतं पण ही थोडीशी चटणीही आरोग्यासाठी खूप मोलाची असते. चटणीमुळे जेवणाला चटकदार चव तर येतेच शिवाय आपली पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठीही चटणी महत्त्वाची असते. आपलं शरीर डीटॉक्स करण्याचा पारंपरिक प्रकार म्हणजे जेवणात चटणी खाणं. आपल्या शरीरासाठी अँण्टिऑक्सिडण्टस अतिशय महत्त्वाचे असतात. थोड्याशा चटणीतूनही मोठ्या प्रमाणात शरीराला अँण्टिऑक्सिडण्टस मिळतात.'जर्नल ऑफ फूड सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी'त प्रकाशित झालेला एक अभ्यास सांगतो की घरगुती तयार केल्या जाणार्या ताज्या भारतीय चटण्या शरीराला अतिरिक्त पोषण देतात. या चटण्यांमधील मूळ घटक पोष्टिक असतात. असे काही मूळ घटक एकत्र येऊन तयर होणारी चटणी आपल्या आतडयांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. आरोग्यास लाभदायक ठरतात अशा चार प्रकारच्या चटण्या आहेत. आपल्या रोजच्य जेवणात यापैकी एक असायलाच हवी.
ओल्या नारळाची चटणी
छायाचित्र- गुगल
ओल्या नारळात पचनास मदत करणारे फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर मधुमेहाचा धोका टाळण्याचं आणि मधुमेह असल्यास रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं महत्त्वाचं काम करतात. ओल्या नारळात मोठ्या प्रमाणात आरोग्यास उपयुक्त फॅटस असतात. ओल्या नारळात फायबर हा घटक महत्त्वाचा असतोच शिवाय त्यात मॅग्नीज, लोह, सेलेनियम आणि फॉस्फरस हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच जेवणात ओल्या नारळाची चटणी खाणं महत्त्वाचं मानलं जातं.ओल्या नारळाची चटणी करताना त्यात थोडे शेंगदाणेही घालावेत. ओलं नारळ, शेंगदाणे, आलं , हिरवी मिरची आणि मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. ही चटणी अशीही छान लागते. आवडत असल्यास या चटणीला लाल मिरची, कढी पत्ता आणि मोहरीचा तडकाही देता येतो.
पुदिना चटणी
छायाचित्र- गुगल
पुदिना हा शरीराला थंडावा देतो. पुदिन्याची चटणी आरोग्यास अतिशय फायदेशीर असते. पचन व्यवस्था सुधारण्यासोबतच ही चटणी रोजच्या आहारात असली तर पोटातल्या दाहची समस्याही दूर होते. पुदिन्याच्या पानांना ताजा तवाना करणारास सुगंध असतो. या सुगंधाचं महत्त्व स्वादापुरतीच मर्यादित नसून पुदिन्याच्या पानांच्या या गंधानं भीती सारखे मानसिक आजारही कमी होतात. जेवताना पुदिन्याची चटणी खाल्ल्यानं शरीर आणि मनाला उत्साह वाटतो.
पुदिन्याची चटणी करण्यासाठी पुदिना घ्यावा. जेवढा पुदिना आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात कोथिंबीर, काळे मिरे, हिरवी मिरची, मीठ, हिंग, जिरे घालावे. हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावं. वाटलेल्या चटणीत लिंबू पिळावं . ही चटणी जेवतांना तोंडाला चव आणते.
लसणाची चटणी
छायाचित्र- गुगल
लसणाच्या चटणीमुळे जेवणाला छान रुची येते. लसूण नियमित खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित राहातो. लसणात बी6 हे जीवनसत्त्व, मॅग्नीज आणि सेलेनियम हे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक रक्तातील साखर नियंत्रित करतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. लसणाची चटणी रोजच्या आहरात असल्यास मधुमेह नियंत्रित होतो.लसणाची चटणी झटक्यात तयार होते. चटणीसाठी मूठभर सोललेला लसूण घ्यावा. त्यात सुक्या लाल मिरच्या, थोडं आलं आणि मीठ घालावं. हे सर्व मिक्सरवर वाटून घ्यावं.
कोथिंबीर चटणी
छायाचित्र- गुगल
स्वयंपाकात कोथिंबीर पदार्थाची चव आणि आकर्षकता वाढवण्यासाठी अतिशय गरजेची असते. कोथिंबीरच्या चटणीमुळे जेवणास उत्तम स्वाद येतो शिवाय शरीरास पोष्टिक घटकही मिळतात. कोथिंबीरमधे बुरशीविरोधी आणि अँंण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. ही चटणी रोज जेवणात खाल्ल्यास त्वचेचं आरोग्यही सुधारतं. कोथिंबीरची चटणी नियमित खाल्ल्यास त्वचेवरील डाग, मुरुम पुटकुळ्या कमी होतात आणि त्वचेचं संरक्षण होतं. कोथिंबीरची चटणी खाल्ल्यानं रक्त स्वच्छ होतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.कोथिंबीरची चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर धुवून घ्यावी. ती मिक्सरच्या भांड्यात घालावी. त्यात थोड्या लसणाच्या पाकळ्या, आलं, हिरवी मिरची आणि मीठ घालावं. हे सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटावं. या चटणीला थोडा आंबटपणा येण्यासाठी आणि असा आंबटपणा हवा असल्यास त्यात थोडं दही घालावं. पण चटणीत दही घालायचं असेल तर लसूण घालू नये. कोथिंबीरच्या चविष्ट चटणीमुळे आपली पचनव्यवस्था सुधारते तसेच त्वचाही उजळते.