तुम्हीही सोडा पिण्याचे शौकीन असाल तर सावधान, कारण ते हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे. स्वीडनमधील ७०००० लोकांवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, सोडा पिण्यामुळे स्ट्रोक, हार्ट फेल्यूअर, अनियमित हृदयाचे ठोके यासह अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोडा पीत असाल तर ही सवय लगेच सुधारा.
सोडा पिणं धोकादायक
स्वीडनमध्ये झालेल्या या अभ्यासात सहभागी झालेल्या सर्व लोकांनी १९९७ ते २००९ पर्यंत आहाराशी संबंधित प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, शुगर ड्रिंक, जाम किंवा मध, कँडी-आईस्क्रीम किंवा मिठाई यापासून किती कॅलरीज मिळतात हे विचारण्यात आलं. २० वर्षांहून अधिक काळ पाठपुरावा केल्यानंतर, सुमारे २६००० लोकांना हृदयविकाराचा त्रास झाला. सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्यांमध्ये हा धोका सर्वाधिक असल्याचं अभ्यासात सांगण्यात आलं.
आरोग्याचं कसं होतं नुकसान?
सोडा म्हणजेच सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कन्सन्ट्रेडेड शुगर असते, ज्यामुळे शरीराला जास्त नुकसान होतं. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, सोड्यामध्ये कॅलरीज असतात, तर मिठाईमध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्ससारखे पोषक घटक असतात, सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, त्यामुळे इन्सुलिन हार्मोनला जास्त काम करावं लागतं. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शरीरात जळजळ होते आणि नसांचं गंभीर नुकसान होते. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीय वाढतो.
सोडा प्यायल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
हार्ट ॲटॅकचा धोका
शरीर आणि नसांमध्ये सूज
वजन वाढणे
लठ्ठपणाचा धोका
हाय ब्लड प्रेशर
कोलेस्टेरॉलची समस्या
काय केलं पाहिजे?
ज्या पद्धतीने तरुणांमध्ये सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक पिण्याचं व्यसन वाढत आहे, ते अत्यंत घातक ठरू शकतं, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे. सॉफ्ट ड्रिंक्स ऐवजी पाणी किंवा स्मूदी प्यावी. तुमच्या आहारातील फक्त १०% कॅलरी साखरेपासूनच आल्या पाहिजेत. सॉफ्ट ड्रिंकट्या एका कॅनमध्ये १२ चमचे साखर असते, जी दैनंदिन मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे यापासून दूर राहिले पाहिजे.