रोगप्रतिराकशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात मसालायुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. तुमचा विश्वास बसणार नाही पण रोजच्या जेवणात हमखास वापरला जाणारा लसूण आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो. जरी लसणाचा वापर अनेक आजारांना बरं करण्यासाठी केला जात असला तरी लसणाचं अधिक सेवन जीवघेणं ठरू शकतं. जिवोत्तम आयुर्वेद केंद्र, बेंगलोरचे आयुर्वेद वैद्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी सांगितले की, लसणाचे सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. त्याचा जास्त वापर आरोग्यासाठी मोठी हानी पोहोचवू शकतो.
लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे कारण ते रक्त शुध्दीकरण, चरबी चयापचय, प्रथिने चयापचय आणि आपल्या शरीरातून अमोनिया काढून टाकण्यासारखे विविध कार्य करतो. अनेक अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की लसणीमध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हरमध्ये विषबाधा होऊ शकते.
उलटी येणं, राग येण्यासाठी लसणाचे सेवन कारणीभूत
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, रिकाम्या पोटी ताज्या लसणाचे सेवन केल्याने चिडचिड, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, लसणामध्ये काही संयुगे असतात ज्यामुळे जीईआरडी होऊ शकते.
रक्त पातळ होण्याचा नैसर्गिक मार्ग
लसूण नैसर्गिकरित्या रक्त पातळ करतो. म्हणूनच, जर आपण वॉरफेरिन, एस्पिरिन इत्यादी रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर आपण लसणाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. कारण रक्त पातळ करणारे औषध आणि लसूणाचे अति सेवन यांचा एकत्रित परिणाम घातक ठरू शकतो.
या महिलांसाठी लसूण घातक
गर्भवती महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी या काळात लसूण खाणे टाळावे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर स्तनपान करणा -या स्त्रियांनी लसणीचे जास्त सेवन केले तर आईच्या दुधाची चव बदलते, जे मुलासाठी चांगले नाही.
लसणाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम
जर लसणीचे जास्त सेवन केले गेले तर तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. दुर्गंधीचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले सल्फर कंपाऊंड.
रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्यास अतिसार होऊ शकतो. लसणीमध्ये सल्फर सारखी वायू निर्माण करणारी संयुगे असतात ज्यामुळे अतिसार होण्याची शक्यता असते.
तज्ञांच्या मते, लसणीचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो आणि त्याच्याशी संबंधित अनेक लक्षणे उद्भवू शकतात.
विविध क्लिनिकल चाचण्यांतून समोर आलेल्या माहितीनुसार लसूण जास्त खाल्ल्यानं खूप घाम येऊ शकतो. योनीचे इन्फेक्शन, यीस्ट संसर्गाच्या उपचारांच्या दरम्यान लसूण खाणे टाळा कारण ते योनीच्या नाजूक पेशींसाठी त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.