रोज सकाळी नाश्त्याला पोहे आणि उपमा खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. वेगळं काहीतरी करायला आपल्याकडे तेवढा वेळ असतोच असं नाही. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासूनच काहीतरी वेगळं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. रवा आणि पोहे या नेहमीच्याच पदार्थांपासून थोडासा वेगळा आणि तरीही पौष्टीक असा पदार्थ कसा करायचा पाहूया. हे गरमागरम कटलेट भर पावसात तोंडाला चव आणतात आणि पोटभरीचे असल्याने अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. हे कटलेट अगदी झटपट होत असल्याने सकाळच्या घाईत फारसा वेळही जात नाही (Healthy And Crunchy Cutlet Recipe for Breakfast).
साहित्य -
१.पोहे - २ वाट्या
२.रवा - १ वाटी
३. दही - २ चमचे
४. कांदा - अर्धी वाटी
५. कोबी - अर्धी वाटी
६. गाजर - अर्धी वाटी
७. सिमला मिरची - अर्धी वाटी
८. कोथिंबीर - अर्धी वाटी
९. आमचूर किंवा चाट मसाला - अर्धा चमचा
१०. गरम मसाला - १ चमचा
११. तिखट - १ चमचा
१२. हळद - अर्धा चमचा
१३. धणे जिरे पावडर - अर्धा चमचा
१४. मीठ - चवीनुसार
१५. तेल - १ वाटी
१६. तांदूळ पीठ - २ चमचे
कृती
१. रवा आणि दही चांगले एकत्र करून घ्यावे.
२. पोहे भिजवून त्याचे पीठ मळतो त्याप्रमाणे गोळा करून घ्यावा
३. दोन्ही १० मिनिटे भिजवून नंतर एकत्र करावे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा आणि घरात उपलब्ध असतील त्या सगळ्या भाज्या घालाव्यात.
४. या पिठात तिखट, मीठ, मसाला, धणे जिरे पावडर, आमचूर पावडर, हळद घालून सगळे चांगले एकजीव करून घ्यावे.
५. अंदाजे पाणी घालून तांदळाचे पीठ घालून मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ घट्टसर करावे
६. पॅनमध्ये तेल घालून त्यावर या पिठाचे कटलेटसारखे थापून घालावे.
७. दोन्ही बाजूने खरपूस फ्राय करून हे गरमागरम कटलेट खायला घ्यावेत.