नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला रोज वेगळं काय करायचं असा प्रश्न महिलांना कायमच पडतो. सतत पोळी, पराठे, पोहे, उपमा हे तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. मुलांना आवडेल असं आणि तरीही पौष्टीक असं काही द्यायचं म्हणजे तारेवरची कसरत असते. अशावेळी दोघांचेही साध्य होईल असा मध्य मार्ग आपल्याला काढावा लागतो. फळं, पालेभाज्या, फळभाज्या, डाळी असं सगळं मुलांच्या पोटात जावं यासाठी आई म्हणून आपला नेहमीच अट्टाहास असतो. पालेभाजी पोटात जायला हवी हे आपण नेहमीच ऐकतो. पण मुलं मात्र पालेभाजी समोर आली की नाक मुरडतात (Healthy and easy Methi Puri Recipe for tiffin in winter season).
अशावेळी याच पालेभाजीचे काही वेगळे किंवा थोडे चमचमीत पदार्थ केले तर मुलांना ते लक्षातही येत नाही आणि वेगळं काही दिलं म्हणून ते खूश होतात ते वेगळंच. मेथी कडवट असल्याने अनेकदा खाल्ली जात नाही. अशावेळी याच मेथीचे पराठे किंवा भाजी करण्यापेक्षा गरमागरम पुऱ्या केल्या तर त्या अगदी आवडीने खाल्ल्या जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला स्निग्धतेची आवश्यकता असल्याने तळलेल्या पुऱ्या खाल्ल्या तरी त्याचा म्हणावा तितका त्रास होत नाही. पाहूयात मेथीच्या पुऱ्यांची पौष्टीक आणि झटपट रेसिपी...
साहित्य -
१. गव्हाचे पीठ - २ ते ३ वाट्या
२. बेसन - १ वाटी
३. मेथी - १ ते १.५ वाटी बारीक चिरलेली
४. धणेजीरे पावडर - १ चमचा
५. हळद - १ चमचा
६. तिखट -अर्धा चमचा
७. तीळ - १ चमचा
८. मीठ - चवीनुसार
९. तेल - २ वाट्या
१०. ओवा - अर्धा चमचा
११. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा
कृती -
१. मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायची.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ आणि बेसन घालून त्यामध्ये मेथी, आलं-लसूण-मिरची पेस्ट घालायची.
३. यामध्ये धणेजीरे पावडर, तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा आणि थोडं तेल घालायचे.
४. अंदाजे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवायचे.
५. हे पीठ १० मिनीटांसाठी सुती कापडाने किंवा ताटलीने झाकून मुरत ठेवायचे.
६. थोड्या जाडसर एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या.
७. कढईत तेल तापवत ठेवून लाटलेल्या पुऱ्या यामध्ये खरपूस रंगावर तळायच्या.
८. या टम्म फुगलेल्या पुऱ्या नाश्त्याला किंवा डब्यातही लोणचं किंवा दही यांसोबत किंवा नुसत्याही अतिशय छान लागतात.