Join us  

पीठ न आंबवता करा जाळीदार-कुरकुरीत डोसा, नेहमीच्या डोशाला द्या थोडा ट्विस्ट..ब्रेकफास्टसाठी हेल्दी रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 11:44 AM

Healthy And Quick Dosa Recipe : हा डोसा मस्त कुरकुरीत होत असल्याने सगळेच आवडीने खातात.

डोसा हा अनेकांचा विक पॉईंट असतो. गरमागरम डोसा चटणी, बटाटा भाजी, सांबार अगदी प्रसंगी भाजीसोबतही मस्त लागतो. हा डोसा मस्त कुरकुरीत असेल तर त्यावर फक्त बटर किंवा तूप असेल तरीही चालते. डोसा म्हटल्यावर आपल्याला डाळ-तांदूळ भिजवणे मग ते वाटणे आणि ते आंबवणे अशी सगळी प्रक्रिया करावी लागते. यामध्ये बराच वेळ जातो. मात्र रात्री डोसा करायचा विचार डोक्यात आला आणि सकाळी ब्रेकफास्टला हा बेत करायचा असेल तर एक भन्नाट आयडीया आपण करु शकतो (Healthy And Quick Dosa Recipe).

विशेष म्हणजे यामध्ये डाळींचे प्रमाण जास्त असल्याने नेहमीच्या डोशापेक्षा तो जास्त हेल्दी होतो, त्यामुळे शरीराला बऱ्याच प्रमाणात प्रोटीन्स मिळण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये शरीराला प्रोटीन्स मिळणे अतिशय आवश्यक असल्याने ही रेसिपी फायदेशीर ठरते. लहान मुलांना साधारणपणे कुरकुरीत डोसा आवडतो. नेहमीच्या डाळ-तांदूळाचा डोसा म्हणावा तितका कुरकुरीत होत नाही, मात्र हा डोसा मस्त कुरकुरीत होत असल्याने सगळेच आवडीने खातात. पाहूया ही सोपी रेसिपी कशी करायची ...

साहित्य -

१. तूर डाळी - अर्धी वाटी 

२. मूग डाळ - अर्धी वाटी 

३. मसूर डाळ - अर्धी वाटी 

४. उडीद डाळ - अर्धी वाटी 

५. हरभरा डाळ - अर्धी वाटी 

(Image : Google)

६. पोहे - १ वाटी 

७. मेथ्या - १ चमचा 

८. तांदूळ - १ वाटी 

कृती -

१. वरील गोष्टी त्याच प्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात भिजवायच्या. 

२. सकाळी उठून हे सगळे चांगले मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. 

३. यामध्ये मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ एकजीव करायचे.

४. आवडत असेल तर यामध्ये आपण गाजर, कोबी, कांदा, टोमॅटो यांसारख्या बारीक चिरलेल्या भाज्याही घालू शकतो. म्हणजे मुलांच्या पोटात भाजी जायला मदत होते

५. याशिवाय आलं-लसूण-मिरची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, जीरे असे मसाल्याचे पदार्थ घालून याला वेगळा स्वादही देऊ शकतो. 

६. हे डोसे चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत मस्त लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.