दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यात मोठा गॅप असतो. म्हणूनच कधीकधी सायंकाळी ऑफिसमधून घरी आलं की काहीतरी खावं वाटतं. मुलंही क्लासेस, ट्यूशन संपवून संध्याकाळच्या वेळी घरी आलेली असतात. अशावेळी त्यांनाही काहीतरी तोंडात टाकायला हवं असतं. बरं या वेळेचं खाणं खूप हेवी असूनही चालत नाही. कारण त्यामुळे भूकमोड होते आणि मग रात्रीचं जेवण जात नाही. अशा वेळी काय खावं किंवा मुलांना काय खायला द्यावे, असा प्रश्न बहुसंख्य महिलांना नेहमीच पडलेला असतो. म्हणूनच यास्मिन कराचीवाला यांनी सांगितलेला Evening Snacks चा पर्याय अतिशय चांगला आहे. हा पदार्थ चटपटीत तर आहेच, पण शिवाय खूप पौष्टिक पण आहे.
यास्मिन यांनी या रेसिपीला यम्मी चाट असे नाव दिले आहे. यासाठी लागणार आहे स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, जिरेपुड, तिखट, चाट मसाला, मिरेपुड, पुदिना चटणी, योगर्ट, चिंच- गुळाची गोड चटणी, मिरची आणि कोथिंबीर.
कसे करायचे यम्मी चाट?
यम्मी चाट करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले स्वीटकॉर्न घ्या. यामध्ये तुम्ही जेवढे कॉर्न घेतले आहे, त्याप्रमाणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, जिरेपुड, मिरेपुड, तिखट, चाट मसाला, मिरेपुड टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. यामध्ये आता पुदिना चटणी, योगर्ट आणि चिंचगुळाची चटणी टाका. चटण्यांमध्ये मीठ असते. त्यामुळे पुन्हा मीठ टाकण्याची गरज नाही. पण जर हवे असेल तर चवीनुसार मीठ टाकावे. सगळे मिश्रण एकदा चांगल्या पद्धतीने एकत्र केले की यम्मी चाट खाण्यासाठी झाले तयार.