शुभा प्रभू साटम
डोसा, उत्तप्पा आणि घावन यांच्या मधला प्रकार म्हणजे बेंने डोसा. कर्नाटक त्यातही मंगलोर भागात हा डोसा स्थानिकांचा फेव्हरिट नाश्ता. आपले पोहे ,सांजा, साबुदाणा खिचडी नेहमी करतो तसाच. हा डोसा करताना यात सफेद लोणी वापरतात ,म्हणजे डोसा करताना तो लोण्यावर भाजला जातो आणि या लोण्याचाच मेकअप करून पानात पडतो,लुसलुशीत आणि चविष्ट प्रकार आहे, असा रुचिबदल नक्कीच सगळ्यांना आवडेल. सोबत आपली खोबरे चटणी किंवा सांबार.तर हा बेंने डोसा. त्याला बेंने डोसा/लोणी डोसा/दावणगिरी डोसा असंही म्हणतात. आता हिवाळ्यात तर हा गुबगुबीत नाश्ता हवाच मस्त.
(Image : google)
कसा करायचा बेंने डोसा?
साहित्य
उकडा तांदूळ(हाच घेणे) 2 छोट्या वाट्याउडीद डाळ अर्धी वाटीचुरमुरे 2 वाट्या(प्रमाणाला वाटी एकच वापरणे)चार मेथी दाणेमीठमैदा (१ चमचा)घरचे लोणी,नसेल तर आपलं बटर नेहमीचे चालून जाते.
(Image : google)
कृती
तांदूळ, डाळ, मेथी, एकत्र चार तास भिजवून ठेवावे.वाटायला घेण्याच्या एक तास आधी कुरमुरे भिजवावेत.तांदूळ +डाळ +मेथी मऊ वाटून घ्यावे,नंतर कुरमुरे घट्ट पिळून ते पण वाटावेत. सर्व एकत्र करून चांगलं घोटून घ्यावे,मीठ साखर घालून झाकून उबदार जागी रात्रभर ठेवावेदुसऱ्या दिवशी पीठ सुरेख फुलून वर आलेले असेल,त्याला सरसरीत करावे पण फुग संपूर्ण मोडू नये,गरज असेल तर किंचित पाणी घालावेआता हिवाळा आहे तर मैदा आणि खायचा सोडा कणभर एकत्र करून पाणी घालून पिठात घालावे,उन्हाळ्यात गरज नाही.या पिठाचे छोटे डोसे काढावेत, लोणी वापरावे, प्रथम तव्यावर घातलं की पसरून झाकण ठेवून शेकून घ्यावे,नंतर दुसरी बाजू,छान जाळीदार मऊ डोसे निघतात. फक्त फार पातळ काढू नयेत,गुबगुबीत हवेत. तव्यावरून काढण्याआधी लोणी फासायला विसरू नये. हे बेंने डोसे गार झाले तरीही मऊच राहतात. डब्यात द्यायला चांगले. आणि नाश्ता उत्तम. पोटभर. चविष्ट.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)