आपला आहार चांगला असेल तर आपली तब्येत चांगली राहते असे आपण नेहमी ऐकतो. घरचे, ताजे अन्न खाणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले हे आपल्याला माहित असते. मात्र कधी ऑफीशियल मीटिंग्जच्या निमित्ताने तर कधई कोणाला भेटण्यासाठी, कधी परगावी दौऱ्यासाठी जावे लागल्याने आपले हॉटेलमध्ये खाणे होतेच. महिन्यातून एकदा किंवा दोनदा हॉटेलमध्ये खाणे वेगळे पण सारखेच हॉटेलमध्ये खाणे होत असेल तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. हे पदार्थ किती शिळे असतात आपल्याला माहित नाही. तसेच ते पदार्थ ज्याठिकाणी तयार केले जातात त्याठिकाणची स्वच्छता, यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता असे सगळेच प्रश्न असतात. हॉटेलमध्ये सतत मैद्याचे पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले तर आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नसते. जिभेला हे पदार्थ चांगले लागत असतील तरी लठ्ठपणा, डायबिटीस, अॅसिडीटी, कोलेस्ट्रॉल यांसारख्या तक्रारींना असा आहार कारणीभूत ठरतो. मग हॉटेलमध्ये जाऊनही खाता येतील असे चविष्ट आणि तरीही हेल्दी पर्याय (Healthy Food Options In Hotel) कोणते ते पाहूया...
१. सूप
सूप हा प्रकार साधारणपणे भाज्यांपासून बनवलेला असतो. भाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असल्याने आपण सूप आवर्जून ऑर्डर करु शकतो. तसेच सूप गरम असल्याने पचायला हलके असते, त्यामुळे पोट भरण्यासही मदत होते. सूप साधारणपणे सगळ्या हॉटेलमध्ये उपलब्ध असते. त्यामुळे सूप हा हॉटेलमध्ये घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
२. सलाड
सध्या बहुतांश हॉटेलमध्ये डाएटचा विचार करुन वेगवेगळ्या पद्धतीची सलाड मिळतात. यामध्ये ग्रीन सलाडपासून ते कडधान्यांपर्यंतच्या सलाडचा समावेश असतो. सलाडमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे शक्य तेव्हा हॉटेलमध्ये तुम्ही सलाड घेऊ शकता. अनेकदा यामध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन्स केलेली असल्याने हे सलाड आणखी छान लागते.
३. पनीर-चीज
तुम्ही शाकाहारी असाल पनीर, चीज अशा गोष्टी तुम्ही आवर्जून खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असल्याने इतर तळकट, तेलकट गोष्टी खाण्यापेक्षा हे खाल्लेले केव्हाही चांगले. पनीरमध्ये स्टार्टर, भाजी, भात असे सगळे प्रकार आपण नक्की ट्राय़ करु शकतो. किंवा डोसा, उत्तप्पा असे पदार्थ घेत असाल तर त्यावर चीज आवर्जून घ्यायला हवे. त्यामुळे आपल्या पदार्थाची पौष्टीकता वाढायला मदत होते.
४. डाळीचे पदार्थ
अनेकदा हॉटेलमध्ये मसाला पापड, टोमॅटो ऑम्लेट, दही वडा, मेदूवडा, मूग भजी, थालिपीठ असे प्रकार मिळतात. यामधून आपल्या शरीरात डाळी आणि पर्यायाने प्रोटीन्स जाणार असल्याने असे पदार्थ खाण्याला पसंती द्यावी. पावभाजी किंवा पिझ्झा, पास्ता यापेक्षा हे खाणे केव्हाही जास्त चांगले असल्याने हॉटेलमध्ये खावे लागत असेल तर या पदार्थांचा प्रामुख्याने विचार करायला हवा.