Join us  

सकाळी नाश्त्याला खीर खाण्याची पारंपरिक रीत, फायदे ३ - थंडीत वजन वाढवायचे, पोषण हवे तर उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 9:32 AM

Healthy Kheer Recipe for Winter Breakfast : बाहेर थंडीचा कडाका वाढत असताना शरीराचे पोषण होईल असा ब्रेकफास्ट असायला हवा.

ठळक मुद्देआपल्या आवडीप्रमाणे जायफळ, वेलची यामुळे खीर आणखी चविष्ट होते. खीर गोड असली तरी आवडीप्रमाणे कमी जास्त साखर किंवा गूळ घालता येतो

थंडी म्हणजे तब्येत कमावण्याचा काळ. या काळात शरीर जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च करते आणि खाल्लेले अन्न पचवतेही. थंडीत आपल्याला नेहमीपेक्षा चांगली भूक लागते. ब्रेकफास्ट हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. सकाळच्या वेळी पोटभर खाल्लेले असेल तर पोट भरलेले असल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यामुळे ब्रेकफास्ट हा पोषण देणारा असेल तर थंडीत ताकद वाढण्यास मदत होते. त्यामुळे बाहेर थंडीचा कडाका वाढत असताना शरीराचे पोषण होईल असा ब्रेकफास्ट असायला हवा. खीर हा थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ असून या काळात कोणत्या खिरी खायला हव्यात याविषयी (Healthy Kheer Recipe for Winter Breakfast)...

(Image : Google)
 १. अळीव 

आपण बरेचदा अळीवाचे लाडू खातो पण खीर खातोच असे नाही. अळीव आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून थंडीत शरीराला पोषण मिळण्यासाठी अळीवाची खीर आवर्जून खायला हवी. अळीव रात्रभर पाण्यात भिजवल्यावर चांगले फुगतात. सकाळी ते तूपात परतून त्यामध्ये गूळ, नारळ आणि दूध घालून खीर करावी आणि ती गरम खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावी. 

२. बाजरी 

बाजरी हे थंडीत आवर्जून खाल्ले जाणारे धान्य आहे. बाजरीमुळे शरीराला उष्णता तर मिळतेच पण भरपूर ताकदही मिळते. ज्यांना वजन वाढवायचे आहे अशांनी बाजरीची खीर अवश्य खावी. बाजरीचे पीठ तूपावर भाजून त्यामध्ये गूळ, दूध, वेलची पूड, सुकामेवा घातल्यास याचा कस आणखी वाढण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. दलिया 

गव्हाची खीर तर आपल्याकडे थंडीच्या दिवसांत आवर्जून खाल्ली जाते. पोटाल दमदमीत आणि ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम पर्याय असलेली ही खीर करायलाही सोपी असते. दलिया कुकरमध्ये शिजवून मग तूपावर तो चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आवडीनुसार गूळ, खोबरं, सुकामेवा या गोष्टी घालाव्यात. यामध्ये खवा घातला तरी चांगला लागतो. आपल्या आवडीप्रमाणे जायफळ, वेलची यामुळे खीर आणखी चविष्ट होते. 

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनाथंडीत त्वचेची काळजी