मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. काहीशी कडवट चव असली तरी मेथीची (Methi) परतून किंवा पातळ भाजी खायला चविष्ट लागते. पालेभाज्यांमध्ये प्रामुख्याने खाल्ली जाणारी ही भाजी आहारात नियमितपणे असायला हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे असते. त्यामुळे शरीराचे पोषण होण्यास मदत होते हे जरी खरे असले तरी सारखी तिच भाजी किंवा मेथीचे पराठे खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी मेथीचे वेगळे कोणते पदार्थ करता (Healthy Recipe) येतील पाहूया...
१. मेथीचे मुटके
मेथी धुवून बारीक चिरुन घ्यायची. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, बेसन अशी पीठे एकत्र करायची. आपल्याकडे थालिपीठाची भाजणी असेल तर ती भाजणी घातल्यास उत्तम. यात धनेजीरे पावडर, तिखट, मीठ, लसूण, तीळ अशा सगळ्या गोष्टी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचे. याचे हातावर बारीक मुटके तयार करुन त्यांना वाफ आणायची आणि गार झाल्यावर हे मुटके तळून खायचे. वाफवलेले मुटके फ्रिजमध्ये दोन दिवस आरामात टिकतात. तसेच हा पदार्थ चवीलाही अतिशय मस्त लागत असल्याने लहान मुलेही आवडीने खातात. यासोबत दही, सॉस, हिरवी चटणी असे काहीही घेतले तरी छान लागते. त्यामुळे मेथीच्या पौष्टीक पदार्थासाठी हा उत्तम उपाय आहे.
२. मेथीचा पुलाव
भात हा आपल्याकडे प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ. दुपारी आपण सगळेच जण डब्यात पोळीभाजी खात असल्याने संध्याकाळच्या जेवणात गरमागरम भात असेल तर बाकी काही नसेल तरी चालते. आपण इतर भाज्या घालून किंवा पालकाचा ज्याप्रमाणे पुलाव करतो त्याचप्रमाणे मेथीचा भात अतिशय चांगला लागतो. कढईत फोडणी घालून त्यामध्ये आलं-मिरची लसूण पेस्ट घालावी. त्यात तमालपत्र, काळे मिरे, लवंग, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ घालावेत. त्यानंतर मेथीची पाने न चिरता या फओडणीत घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी. त्यानंतर तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. तुम्हाला पनीर आवडत असेल तर पौष्टीकता वाढण्यासाठी तुम्ही पनीरही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून कढईवर झाकण ठेवून शिजवून घ्यावा. हा गरमागरम भात पापड, ताक यांच्यासोबत अगदी आवडीने खाल्ला जाईल.
३. मेथीची भजी
आपण भजी करायची म्हटली की कांदा किंवा बटाटा या गोष्टींचीच करतो. पण मेथीचीही भजी अतिशय छान होतात. यासाठी बेसन पीठ घेण्याऐवजी हरभरा डाळ किंवा मूगाची डाळ भिजत घालावी. ती मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर वाटून त्यामध्ये आवडीप्रमाणे लसूण, मीरची, मीठ, ओवा घालावे. त्यात चिरलेली मेथी घालून मिश्रण एकजीव करावे आणि याची गरमागरम भजी करावीत. खायला अतिशय उत्तम लागणारी ही भजी मेथीमुळे पौष्टीकही होतात.