Join us  

नाश्त्याला करा झटपट, हेल्दी कलरफुल आप्पे, मुलं होतील खूश, आवडीनं खातील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 1:29 PM

Healthy Tasty Breakfast Recipe Appe : मधल्या वेळच्या खाण्यासाठी तर कधी डब्यात द्यायलाही हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

रोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न सगळ्याच महिलांसमोर असतो. पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला की मग आपण साऊथ इंडियन पदार्थांकडे वळतो. त्यातही सतत इडली, डोसा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी झटपट होणारे, हेल्दी आणि कलरफुल असे आप्पे केले तर मुलंही खूश होतात आणि झटपट होत असल्याने आपलाही वेळ वाचतो. आपल्या आणि मुलांच्या आवडीनुसार यामध्ये आपण भाज्या घालू शकतो. त्यामुळे नकळत मुलांच्या पोटात भाज्या जायला मदत होते. हे गरमागरम आप्पे असले की त्याच्या सोबत चटणी किंवा इतर काही नसले तरी चालते. मुलंही अतिशय आवडीने हे आप्पे खात असल्याने कधी मधल्या वेळच्या खाण्यासाठी तर कधी डब्यात द्यायलाही हा उत्तम पर्याय ठरु शकतो. पाहूयात घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हे आप्पे कसे तयार करायचे (Healthy Tasty Breakfast Recipe Appe). 

१. एका बाऊलमध्ये १ वाटी जाड रवा, अर्धी वाटी दही एकत्र करायचे. यामध्ये अंदाजे पाणी घालून भिजवून ठेवायचे. 

२. दुसरीकडे बीट, गाजर किंवा कोबी, पालक, कोथिंबीर, कांदा अशा घरात उपलब्ध असतील त्या भाज्या किसून किंवा चिरुन घ्यायच्या.

(Image : Google)

३. या भाज्या, आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून अंदाजे पाणी घालून हे पीठ १५ मिनीटे झाकून ठेवायचे. 

४. गरज वाटल्यास थोडासा सोडा घालून पुन्हा थोडे पाणी घालून पीठ एकजीव करायचे. 

५. आप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये हे पीठ घालायचे आणि आप्पे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे.

६. यासोबत सांबार, चटणी केली नाही तरी चालते. हे गरमागरम आप्पे मुलं अगदी आवडीने खातात.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.