Join us  

5 मिनिटात तयार होते पेरुची हेल्दी टेस्टी चटणी, अशी फक्कड चटणी घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 7:11 PM

5 मिनिटात तयार होते पेरुची हेल्दी टेस्टी चटणी.. ज्याच्यासोबत खाणार त्याचा स्वाद वाढणार!

ठळक मुद्देपेरुच्या चटणीसाठी पेरु मध्यम पिकलेला घ्यावा.पेरुच्या चटणीत आवडत असल्यास गूळ घातला तरी चालतो. 

गोड आंबट चवीचा पेरु म्हणजे आरोग्यास फायदेशीर फळ. पेरुमध्ये फायबर आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं.  पेरुच्या नियमित सेवनानं शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ऋतू बदलताना होणारे त्रास पेरुच्या सेवनानं आटोक्यात राहतात. पेरुचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे पेरु खाल्ल्यानंतर रक्तातील साखर पटकन वाढत नाही. पेरु खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेलं राहातं. पेरुच्या या गुणधर्मामुळेच पेरु वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पेरुची कोशिंबीर, स्मूदी, रायतं जसं चविष्ट आणि पौष्टिक असतं तशीच पेरुची हिरवीगार चटणी चवीला आणि गुणाला उत्तम असते. पेरुच्या चटपटीत चटणीनं सोबतच्या पदार्थांचा स्वादही वाढतो. अवघ्या 5 मिनिटात पेरुची चटणी तयार होते. 

Image: Google

कशी करावी पेरुची चटणी?

पेरुची चटपटीत चटणी करण्यासाठी 1 मध्यम आकाराचा पेरु,  5-6 लसणाच्या पाकळ्या, 10-12 तुळशीची पानं, 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 मोठे चमचे बदाम/ काजूची पूड, चवीनुसार मीठ, 2-3 मोठे चमचे ऑलिव्ह तेल, 2-3 मोठे चमचे पाणी, अर्धा चमचा चाट मसाला, छोटा चमचा काळी मिरेपूड, 1 चमचे भाजलेले तीळ आणि 2 चमचे लिंबाचा रस घ्यावा. 

Image: Google

पेरुची चटणी तयार करण्यासाठी पेरु मध्यम पिकलेला घ्यावा. पेरुच्या बिया काढून पेरु बारीक चिरुन घ्यावा. लसणाचे बारीक तुकडे करावेत. मिक्सरच्या भांड्यात सर्व सामग्री एकत्र करुन वाटावी. चटणी वाटताना त्यात थोडं पाणी घालत वाटावी म्हणजे चटणी बारीक वाटली जाते. वाटलेली चटणी एका मोठ्या भांड्यात काढावी. चटणीवर दोन ते तीन चमचे ऑलिव्ह तेल घालून चटणी हलवून घ्यावी. या चटणीवर भाजलेले तीळ घालावेत. चटणीत बदाम किंवा काजूची पूड घालून चटणी व्यवस्थित हलवून घ्यावी. पेरुची ही हिरवीगार चटणी जेवणाची चव वाढवते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजना