लहान मुल खाण्याच्या बाबतीत आपल्या पालकांना खूपच हैराण करतात. "मला हेच नको, मला तेच हवे" असे अनेक नखरे लहान मुलांचे असतात. आपल्या लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी पालक त्यांना पौष्टिक आहारासोबतच वेगवेगळे चविष्ट पदार्थ खायला देतात. अशावेळी लहान मुले व्यवस्थित जेवत नाहीत किंवा काही खात - पित नाहीत आणि त्यांना खाऊ घालताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा स्थितीत पालकांची चिंता वाढते. आपल्या मुलांनी चांगला पौष्टिक, सकस आहार घ्यावा, सगळ्या भाज्या, फळे आवडीने खावीत असे प्रत्येक पालकांना वाटत असते परंतु मुलं काही केल्या खात नाहीत(Vegetable Momos Recipe).
काहीवेळा तर शाळेत दिलेला पोळी - भाजीचा डबा देखील आहे तसाच परत आणतात. अशावेळी आपल्या मुलांना पौष्टिक आणि चांगला आहार कसा द्यावा असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. शक्यतो मुलं पोळी भाजी खायला नकार देतात. अशावेळी आपण मुलांना पोळी भाजीची पौष्टिकता मिळावी म्हणून चपाती आणि भाज्यांचा वापर करुन तयार केलेले मोमोज देऊ शकतो. मुलांना चटपटीत आणि वेगवेगळे जंक फूड खायला खूपच आवडतात. मोमोज तर कित्येक चिमुकल्यांचे (How to make momos healthy for kids at home) आवडते स्नॅक्स आहे. अशावेळी आपण रोजचीच चपाती आणि काही भाज्यांचा वापर करुन घरच्या घरी चटपटीत, मसालेदार, टेस्टी मोमोज तयार करु शकतो. घरच्या घरी पौष्टिक मोमोज तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Healthy Whole Wheat Momo Recipe for Kids).
साहित्य :-
१. कोबी - १ कप
२. गाजर - १ कप
३. फरसबी - १ कप
४. पनीर - १ कप
५. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. रेड चिली सॉस - १/२ टेबलस्पून
८. सोया सॉस - १/२ टेबलस्पून
९. कणीक - १ कप (चपाती साठी मळून घेतो तसेच)
१०. शेजवान सॉस - १/२ टेबलस्पून
११. तेल - २ ते ३ टेबलस्पून
१२. गव्हाचे पीठ - १ कप
१३. पाणी - गरजेनुसार
१४. टोमॅटो सॉस - १ टेबलस्पून
१५. ओरेगॅनो हर्ब्स - १/२ टेबलस्पून
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
कृती :-
१. एका कढईत थोडंसं तेल घेऊन या तेलात बारीक किसलेला कोबी, गाजर, फरसबी, पनीरचे तुकडे घालावेत. या भाज्या तेलात हलक्या परतून घ्याव्यात.
२. त्यानंतर या भाज्यांमध्ये आपण आपल्या आवडीनुसार काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून मोमोजच्या आतील स्टफिंग तयार करुन घ्यावे.
३. आता मोमोजच्या बाहेरच्या आवरणासाठी चपातीसाठी जसे कणीक मळून घेतो तसे कणीक मळून घ्यावे. कणीक मळून घेतल्यानंतर त्याच्या गोलाकार छोट्या चपात्या लाटून घ्याव्यात.
४. या गोलाकार चपात्यांच्या बरोबर मधोमध हे भाज्यांचे स्टफिंग भरुन घ्यावे. त्यानंतर चारही बाजुंनी हे आवरण बाहेरुन बंद करुन घ्यावे.
५. आता एका चाळणीला आतून तेल लावून घ्यावे त्यात हे मोमोज ठेवून द्यावेत. आता एका मोठ्या कढईत पाणी घेऊन हे पाणी गरम करून घ्यावे. त्यानंतर त्यावर ही चाळण ठेवून या चाळणीत हे मोमोज ठेवून द्यावेत. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून हे मोमोज उकडवून घ्यावेत.
६. १५ ते २० मिनिटे हे मोमोज उकडवून घ्यावेत आणि त्यानंतर हे मोमोज चाळणीतून काढून त्यावर ओरेगॅनो हर्ब्स भुरभुरवून खाण्यासाठी सर्व्ह करावेत.
आपले गरमागरम मोमोज खाण्यासाठी तयार आहेत. मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला आपण हे मोमोज शेजवान सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.