स्वयंपाक शिकताना आधी डाळ -तांदळाचा कुकर लावायला शिकलं जातं. वरण भात करायला शिकणं ही देखील मोठी गोष्ट आहे. साधा भात करता येत नाही असे टोमणेही अनेकींना ऐकावे लागतात. भातावरुनही कसा स्वयंपाक जमतो हे आजही जोखलं जातं. पण कुठल्या परीक्षेत पास होण्यासाठी म्हणून नाही पण भात व्यवस्थित करायला जमणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यामुळे तांदूळ कितीही चांगल्या प्रतीचा असला पण भात नीट जमला नाही तर खाण्याची मजाच जाते.भात करताना तो कधी पाणी जास्त झाल्यानं चिकट होतो, गोळा होतो. असा भात वरण-आमटीसोबत खाण्यासही कंटाळा येतो. तर कधी कधी भात मोकळा व्हावा असं वाटत असताना तो खूपच फडफडीत होतो. नीट शिजत नाही. असा भात घशाखालीही उतरत नाही. म्हणूनच भात नीट करता येणं हे देखील स्वयंपाकातलं एक कौशल्य आहे. भात नीट मोकळा होण्यासाठी तीन सोप्या सहज युक्त्या आहेत. त्या करुन पाहिल्या तर भात नेहेमी मनासारखाच शिजेल.
छायाचित्र- गुगल
भात मोकळा होण्यासाठी
1. भात नीट होण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती ही बाब खूप महत्त्वाची आहे. अनेकजणी भात करतान तांदळात पाणी मोजून मापून टाकत नाही आणि मग भात बिघडतो. भात जर भांड्यात मोकळा शिजवणार असू तर एका वाटीला दोन वाट्या पाणी असं प्रमाण घ्यावं. आणि भात जर कुकरला लावणार असू तर एका वाटीला दीड वाटी पाणी असं प्रमाण घ्यावं. या प्रमाणात भात भांड्यात नाहीतर कुकरमधे करा तो छान मोकळाच होतो.
2. भात करताना मीठासोबतच थोडा लिंबाचा रसही घालावा. भात जर भांड्यात शिजवत असाल तर पाण्याला उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस घालून मग झाकण ठेवावं आणि तो जर कुकरमधे शिजवत असाल तर एक शिट्टी झाल्यावर गॅस पाच मिनिटं मंद आचेवर ठेवावा. लिंबाचा रस टाकल्यानं भात छान पांढरा दिसतो आणि मोकळा शिजतो.
छायाचित्र- गुगल
3. भात करताना तांदूळ धुतांना घाई करु नये. तांदूळ चांगले चार पाच वेळा पाण्यानं धुवावेत. त्यामुळे तांदळातले तण निघून जातं. त्यामुळे भात मोकळा होतो. तसेच भात करताना त्यात एक चमचा तूप किंवा बटर घालावं. त्यामुळे भात छान मोकळा शिजतो आणि भाताला स्वादही छान येतो.