सकाळी नाश्त्याला पौष्टिक आणि पोटभरीचे पदार्थ हवे असतात. इडली हा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे. डाळ तांदूळ वापरुन इडली करताना डाळ तांदुळ भिजत घालणं, ते वाटणं, फेटणं, आंबवणं अशी दीर्घ प्रक्रिया असते. पण कधीकधी घाईच्या वेळेतच इडली हवी असते. पण त्यासाठीची तयारी अजिबात झालेली नसते. अशा वेळेस इडलीचा प्लॅन बदलण्याची अजिबात गरज नसते. त्यासाठी झटपट इडली हा एक पर्याय आहे. पर्याय एक असला तरी झटपट इडलीचे अनेक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार करता येतात.
Image: Google
1. पोह्याची इडली
पोह्याची इडली करण्यासाठी 1 कप पोहे, 1 कप तांदळाचा रवा, 1 कप दही, चवीनुसार मीठ, पाऊण चमचा फ्रूट सॉल्ट एवढं जिन्नस घ्यावं.
इडली करताना आधी पोहे वाटून त्याचं पीठ करावं. त्यात एक कप दही घालावं. पोह्याचं पीठ आणि दही एकत्र करुन झालं की त्यात तांदळाचा रवा घालून मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. मिश्रण चांगलं पाच ते सात मिनिटं फेटून झालं की त्यात मीठ आणि पाणी घालावं. मिश्रण एकदा हलवून घ्यावं आणि अर्धा तास झाकूण ठेवावं. मिश्रण कोरडं वाटल्यास त्यात पाणी घालावं. इडली लावण्याच्या आधी मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालावं आणि इडल्या लावाव्यात.
Image: Google
2. ओटस इडली
ओटसची इडली करण्यासाठी 1 कप ओटस ( इन्स्टंट ओटस/स्टील कट ओटस/ रोल्ड ओटस, अर्धा कप रवा, अर्धा कप दही, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटं गाजर किसून घेतलेलं, मीठ, गरजेनुसार पाणी, पाऊण चमचा बेकिंग सोडा किंवा छोटा दिड चमचा फ्रूट सॉल्ट, तडक्यासाठी 1 मोठा चमचा तेल, 1 छोटा चमचा हरभरा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, , बारीक चिरलेला कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे एवढं जिन्नस घ्यावं.
इडलीसाठी आधी ओटस एका कढईत मध्यम आचेवर चार- पाच मिनिटं भाजावेत. नंतर गॅस बंद करावा. एका ताटात भाजलेले ओटस काढावेत. ते चार पाच मिनिटं थंड होवू द्यावेत. थंड झाल्यावर ओटस मिक्सरमधून रवाळ दळावेत.
त्याच कढईत तेल गरम करावं. त्यात हरभरा डाळ, उडीद डाळ, मोहरी, कढीपत्ता, जिरे घालावेत. ते चांगले परतून घ्यावेत. नंतर त्यात रवा घालावा. रवा सोनेरी रंगावर परतावा. त्यानंतर त्यात रवाळ दळलेले ओटस घालावेत. तेही एक मिनिट परतून घ्यावे. मग हे मिश्रण एका भांडयात काढावं. ते थोडं थंड होवू द्यावं. नंतर त्यात अर्धा कप दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेलं गाजर आणि मीठ घालावं. थोडं थोडं पाणी घालून इडलीप्रमाणे मिश्रण दाटसर करावं. हे मिश्रण झाकून 15-20 मिनिटं सेट होवू द्यावं. नंतर मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात थोडं पाणी घालावं. इडलीसाठी मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको. या मिश्रणाचे दोन भाग करावेत. लगेच इडली करणार्या मिश्रणात सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घालावं. दुसर्या भांड्यातील मिश्रणाची जेव्हा इडली करायची तेव्हा त्यात फ्रूट सॉल्ट घालावं. इडली मिश्रणात फ्रूट सॉल्ट ऐवजी बेकिंग सोडा घालणार असाल तर छोटा पाऊण चमचा बेकिंग सोडा घालावा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा. मिश्रण एका दिशेनं चांगलं फेटून घ्यावं. नेहेमीप्रमाणे लावतो तशा इडलीपात्राल इडल्या लावून त्या 15 मिनिटं वाफवाव्यात. इडली कुकरमधून इडली पात्रं बाहेर काढावं. इडल्या थोड्या थंड झाल्या की मग त्या काढाव्यात. नारळाच्या चटणीसोबत छान लागतात.
Image: Google
पनीर इडली
पनीर इडली करण्यासाठी 1 कप फेटलेलं दही, अर्धा कप रवा, अर्धा कप बेसन, 125 ग्राम पनीर, बारीक चिरलेलं गाजर, अर्धा कप बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धा कप कोथिंबीर, दोन मिरच्या, मीठ, दोन चमचे तेल, मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा फ्रूट सॉल्ट घ्यावं.
इडली करण्यासाठी एका भांड्यात दही, रवा, बेसन एकत्र करावं. गुठळ्या राहणार नाही असं फेटावं. थोडं पाणी घालावं. मग त्यात गाजर, सिमला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालावं. सर्व छान एकत्र करुन घ्यावं. तेल गरम करुन त्यात मोहरी, कढीपत्ता घालावा. हा तडका इडली मिश्रणात घालावा. मिश्रण घोळून ते 15 मिनिटं सेट होवू द्यावं. तोपर्यंत पनीर किसावं. 20 मिनिटांनी सेट झालेल्या मिश्रणात पनीर घालावं. मिश्रण दाटसर वाटत असेल तर त्यात पाणी घालावं. इडली पात्रात इडली ठेवणार तेव्हाच मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालावं. 1 चमचा पाणी घालावं. मिश्रण एकदा हळूवार मिसळून घ्यावं. ते खूप फेटू नये.नेहेमीप्रमाणे इडली पात्रात इडल्या लावून वाफवून घ्याव्यात.
Image: Google
रवा इडली
रवा इडली करण्यासाठी 3 छोटे चमचे तेल, मोहरी, जिरे, हरभरा डाळ, हिंग, कढीपत्ता, आलं, बारीक चिरलेलं किंवा किसलेलं गाजर, पाव चमचा हळद, 1 कप जाड रवा, पाऊण कप फेटलेलं दही, 2 चमचे कोथिंबीर, मीठ , पाणी अणि पाव चमचा फ्रूट सॉल्ट घ्यावं.
इडली करताना आधी कढईत तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हरभरा दाळ, हिंग, कढीपत्ता घालावा. नंतर मिरची आणि किसलेलं आलं घालून ते परतून घ्यावं. गॅस मंद ठेवून कढईत रवा घालावा. रवा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यावा. भाजलेला रवा एका भांड्यात काढून घ्यावा. तो चांगला थंड होवू द्यावा. मग त्यात दही, कोथिंबीर, मीठ चांगलं मिसळून मिर्शण करावं. त्यात गरजेनुसार पाणी घालावं. मिश्रण हळुवार फेटून घ्यावं. मग 15 मिनिटं ते सेट करावं. इडली कुकरला लावण्याआधी मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालावं. थोडं हलवलं की लगेच इडल्या लावाव्यात.
झटपट इडलीचे हे प्रकार एकदा करुन पाहा. एकच एक इडली प्रकार खाऊन कंटाळा येणार नाही.