Join us  

सकाळी डबे - ऑफिसची गडबड, स्वयंपाक करताना घाई होते? ७ टिप्स, स्वयंपाक होईल सुपरफास्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 12:29 PM

7 Easy Cooking Hacks For Every Working Woman : सकाळी कामांच्या गडबडीत स्वयंपाक करताना आपला देखील गडबड, गोंधळ होत असेल तर काही सोप्या टिप्स वापरुन पाहू..

सध्याच्या काळात पुरूषासोबतच घरांतील स्त्री देखील वर्किंग वुमन बनली आहे. ती देखील तितक्याच जिद्दीने व हिंमतीने पैसे कमविण्यासाठी, स्वतःचे करियर घडवण्यासाठी घराबाहेर पडते. अशा परिस्थिती घर आणि ऑफिस सांभाळताना तिची तारेवरची कसरत होते खरी. परंतु घरांतील स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय लिलया पेलून नेते. काही वर्किंग वुमन घरातील इतर काम पाहण्यासाठी कामवाली बाई ठेवतात किंवा काही महिला स्वतःच सगळी काम करतात. एकाच वेळी घरांतील काम, स्वयंपाक बनवणे, मुलांकडे लक्ष देणे, ऑफिसचे टार्गेट पूर्ण करणे अशा हजारो कामांचे ओझे तिच्या डोक्यावर असते. त्यात घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे आवडते जेवण बनवायचे म्हणजे तिची पळता भुई थोडी होते. परंतु जर आपण स्वयंपाक घरातील थोडी कामे आधीच करुन ठेवली तर आयत्या वेळी घाई गडबड न होता स्वयंपाक चटकन बनवून होतो. 

सकाळी उठून सगळ्यांचा डबा बनवायचा म्हणजे त्यात सोलणं, कापणं, वाटणं अशी अनेक काम असतात. कदाचित याच कारणांमुळे स्वयंपाक करताना वर्किंग वुमनची खूपच घाई गडबड होते. अनेकदा आवड असूनही नोकरी करणाऱ्या महिलांना किचनमध्ये आपल्या आवडीची डिश बनवणं हे थकवणारं काम वाटतं. खासकरून दिवसभर काम करून घरी आल्यावर अनेकदा वर्किंग वुमनना किचनमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. तसेच रोज समोर उभा राहणार प्रश्न असतोच की आज काय बनवायचं? जर आपण देखील वर्किंग वुमन असाल आणि सकाळी स्वयंपाक करताना आपला देखील गडबड, गोंधळ होत असेल तर काही सोप्या टिप्स वापरुन पाहू(Here Are 7 Quick Fix Cooking Tips For Working Women).  

वर्किंग वुमनने नेमकं करायचं काय ?

१. आठवड्याभराचे मेन्यू प्लॅनिंग :- जे पदार्थ येत्या आठवड्यात बनवायचे असतील त्याच प्लॅनिंग विकेंडलाच करुन घ्यावे. हे प्लॅनिंग झाल्यानंतर ते पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची एक यादी तयार करावी. विकेंडला सामानाची खरेदी करताना या लागणाऱ्या सर्व वस्तूंची एकदाच खरेदी करावी. यामुळे आपल्या डोक्यात आठवड्याभराचा मेन्यू लक्षात राहील आणि आपल्याकडे आवश्यक सामानही घरातच उपलब्ध असेल. त्यामुळे वेळही वाचेल. विकेंडला २ - ३ तासांसाठी केलेल्या प्लॅनिंगमुळे आठवडाभर काय बनवायचे असा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तसेच मेन्यू लक्षात असल्यामुळे घाई - गडबड होणार नाही. 

२. भाज्या कापून, सोलून, निवडून ठेवाव्यात :- सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत भाज्या कापण्यात व सोलण्यात सर्वात जास्त वेळ लागतो. विकेंडला आपण ही देखील कामं करून ठेऊ शकता. उदाहरणार्थ :- मटार सोलून हवाबंद डब्यात ठेवणे, कोंथिबीर व पुदीना मोकळा वेळ मिळाल्यावर निवडून फ्रिजमध्ये स्टोर करणे. काही भाज्या चिरुन ठेवल्यास त्या फ्रिजमध्ये दिर्घकाळ टिकतात, अशा भाज्या चिरुन ठेवाव्यात. यामुळे सकाळचा भरपूर वेळ वाचतो. 

३. कांदा भाजून ठेवावा :- आपल्या प्रत्येक भारतीय पदार्थांमध्ये जास्त करून कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे सकाळी घाई गडबडीत कांदा परतायला वेळ लागतो. जर आपण कांदा आधीच परतून किंवा भाजून हवाबंद डब्यात भरुन फ्रिजरमध्ये स्टोर करून ठेवू शकता. याचा वापर आपण कोणत्याही पदार्थांमध्ये  मध्ये करू शकता.  

४. प्युरी बनवून ठेवा :- आपल्याकडील बरेच पदार्थ बनवताना कांदा, आलं-लसूण, टोमॅटो प्युरीची गरज लागते. प्रत्येकवेळी प्युरी बनवायला वेळ लागतो. त्यामुळे रिकाम्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण यांची प्युरी बनवून फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवावी. त्यामुळे जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण ही प्युरी वापरू शकता. जर आपल्याला प्युरी बनवायला वेळ मिळत नसल्यास, आजकाल बाजारात बऱ्याच ब्रँड्सच्या रेडीमेड प्युरीज मिळतात. या रेडिमेड प्युरीचा वापर देखील आपण करू शकता. या रेडिमेड प्युरी फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवल्यास त्या बऱ्याच काळ टिकतात. सकाळी अचानक एखादी रस्सेदार चविष्ट भाजी  बनवायची असल्यास आपण कमी वेळात ती तयार करू शकता.   

घर आणि ऑफिस काम करुन वैतागलात, दमलात? ७ स्मार्ट उपाय, तुमचा स्ट्रेस होईल हमखास कमी...

५. कडधान्य भिजवून ठेवा :- आजकाल भिजवलेली कडधान्य बाजारात सहज उपलब्ध होतात. पण घरच्याघरी कडधान्य भिजवणं अगदीच सोपं काम आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे मूग, छोले, चणे इ. मोड आणून फ्रिजरमध्ये स्टोर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला पटकन स्वयंपाक उरकायचा असेल आणि भूक लागली असेल, तेव्हा तुम्ही कडधान्याचं हेल्दी स्नॅक्स बनवून खाऊ शकता. यामुळे वेळही वाचेल व हेल्दी आणि टेस्टी खाल्ल्याने वेगळ्या चवीचा आनंद मिळेल. 

६. चटण्या व लोणची :- आपल्या किचनमध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठीचे पदार्थ म्हणून चटणी व लोणची वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असतात . या दोन्हींचा वापर आपण साईड डीश म्हणून करू शकतो. मुलांच्या डब्यांमध्ये कधी पराठ्यासोबत लोणचं किंवा लोणचं - पोळी असंही बदल म्हणून देऊ शकता. तसंच जॅम हा देखील उत्तम पर्याय आहे.   

७. नाश्त्याची तयारी :-  जर आपल्या घरच्यांना साऊथ इंडियन पदार्थांची आवड असेल तर आपण ईडली - डोश्याचे पीठ बनवून ठेऊ शकता. सकाळी नाश्त्यासाठी किंवा टीफीनमध्ये बदल हवा असल्यास आपण काही वेळातच डोसा, ईडली किंवा उत्तप्पा यांसारखे पदार्थ बनवू शकता. आजकाल दुकानातही ईडली - डोसा पीठ तयार मिळतं याचा वापर करूनही आपण झटपट होणारा नाश्ता तयार करु शकता.

टॅग्स :अन्न