पुरणपोळी हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि प्रसिद्ध गोड पदार्थ. होळीच्या दिवशी केली जाणारी ही पुरणपोळी म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण (Holi Celebration 2022) . कधी एकदा होळी येते आणि आपण गरमागरम पुरणपोळीवर ताव मारतो असे अनेकांना झालेले असते. पण पुरणपोळीत (Puranpoli) असणारी डाळ पोटाला बाधेल की काय? पुरणपोळीने पोट जड तर नाही ना होणार? गोड खाणे मधुमेहींना वर्ज्य, पुरणपोळीवर तूप घेतले तर आपले कोलेस्टेरॉल वाढणार नाही ना अशा शंका आपल्या मनात येतात आणि वर्षातून एकदा येणाऱ्या या होळीच्या सणाला आपल्या आवडत्या पुरणपोळीवर ताव मारताना आपण काहीसे कचरतो. पण पथ्य असूनही तुम्हाला पुरणपोळी खाता येऊ शकते. पुरणपोळीतून मिळणाऱ्या कॅलरीजचा विचार न करता त्यातील पोषक घटकांचाही विचार करायला हवा आणि आपल्या पारंपरिक पदार्थांचा सणावाराच्या दिवशी योग्य प्रमाणात आवर्जून आस्वाद घ्यायला हवा. याविषयी सांगताहेत आहारतज्ज्ञ निकीता दळवी-मोरे...
१. पुरणपोळीमध्ये वापरले जाणारे गव्हाचे पीठ, गूळ आणि हरभरा डाळ हे तिन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. गूळ आणि गव्हातून शरीराला कार्बोहायड्रेटस मिळतात. तर हरभरा डाळ ही प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असल्याचे आपल्याला माहित आहे. याबरोबरच हरभरा डाळीतून शरीराला झिंक, फोलेट आणि कॅल्शियम हे घटकही मिळतात. त्यामुळे पुरणपोळी हा एक परिपूर्ण पदार्थ आहे.
२. अनेकदा पुरणपोळी करताना त्यामध्ये गव्हाच्या पीठाऐवजी मैदा वापरला जातो. किंवा गुळाऐवजी साखरेचा वापर केला जातो. पण तसे करणे आरोग्याच्यादृष्टीने चांगले नसते. त्यामुळे गहू आणि गूळ वापरलेला केव्हाही चांगला. उन्हाळ्यात ऊर्जा मिळण्यासाठी साखरेपेक्षा गूळ खाल्लेला जास्त चांगला.
३. पुरणपोळी ही साजूक तुपासोबत खाल्ली जाते. मात्र पोळीवर तूप घेतल्यास चालेल की नाही असा प्रश्न आपल्य़ाला पडतो. पण तुपामुळे हरभरा डाळ पचायला सोपी होते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढेल म्हणून तूप घेणे टाळत असाल तर तसे न करता योग्य प्रमाणात तूप घालून खाल्लेली पुरणपोळी केव्हाही चांगली. अनेकांना हरभरा डाळ पचनासाठी जड वाटते किंवा पित्ताचा त्रास होतो. अशांनी पोळीवर आवर्जून तूप घ्यायला हवे. त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.
४. तूपाबरोबरच अनेकांना गरम पोळी ही दुधात बुडवून खायला आवडते. दूध हे पूर्णान्न असल्याने त्यासोबत पोळी खाल्लेली जास्त चांगली. दुधात असणारे कॅल्शियम आणि अ,ब,क,ड, ई ही जीवनसत्त्वे यांमुळे पुरणपोळीची पोषकता आणखी वाढते. त्यामुळे तुम्ही ठराविक प्रमाणात पुरणपोळी आणि दूध नक्की खाऊ शकता.
५. याबरोबरच पुरणपोळीसोबत केली जाणारी कटाची आमटीही आरोग्यासाठी चांगली असते. आमटीत आपण वापरत असलेले डाळीच्या पाण्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तसेच यामध्ये घातला जाणारा तमालपत्र, कढीपत्ता आणि काळा मसाला यांमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.