होळी सणाच्या दिवशी आवर्जून केला जाणारा बेत म्हणजे पुरणाची पोळी. महाराष्ट्रात होळीला आणि पुरणाच्या पोळीला विशेष महत्त्व असून हा बेत परफेक्ट होण्यासाठी पुरण परफेक्ट होणं गरजेचं असतं. कारण काहीवेळा पुरण फार पातळ झाल्यानं पोळी लाटता येत नाही तर काही वेळा पुरण खूप घट्ट आणि कोरडं झाल्यानं पोळ्या अजिबात लाटता येत नाहीत. मग आपण हे पुरण दुरुस्त करण्याचा बराच प्रयत्न करतो खरा. पण ते आपल्याला हवं तसं होतंच असं नाही. पुरणाचा घातलेला घाट मार्गी लागावा आणि कमीत कमी कष्टात आपलं पुरण आणि पोळ्या सगळंच छान व्हावं यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. म्हणूनच पुरण आणि मग पुरणपोळी परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे समजून घेणं गरजेचं आहे (How To Make Perfect Puran for Puranpoli).
१. अनेकदा आपण हरभरा डाळ घेऊन ती थेट कुकरला लावतो. मात्र त्याऐवजी ही डाळ २ तास आधी भिजत घालावी आणि मग कुकरला लावावी. ती पटकन शिजते आणि चांगली मऊ होते. तसंच डाळ शिजवताना त्यामध्ये खूप जास्त पाणी न घालता डाळीला पुरेसंच पाणी घालावं. त्यामुळे डाळ परफेक्ट शिजते आणि त्यात राहीलेलं पाणी फेकून द्यावं लागत नाही.
२. यानंतर डाळीला चटका देताना गूळ योग्य प्रमाणातच घालावा. प्रमाणापेक्षा जास्त गूळ झाला तर पुरण कडक होतं. तसंच गूळ किसून किंवा एकदम बारीक करुन घालावा म्हणजे तो चांगला एकजीव होण्यास मदत होते.
३. सगळं करुनही पुरण पातळ झालं तर एका सुती कापडात घेऊन ते चांगले दाबून घ्यावे, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून जाण्यास मदत होते. किंवा कढईत घालून आणखी चटका दिला तरी पाणी निघून जाण्यास मदत होते.
४. डाळ शिजताना त्यामध्ये चमचाभर तूप घालावे. म्हणजे डाळ लवकर शिजते आणि चिकटतही नाही. तसेच गुळासोबत थोडी साखर घातल्यास गोडीला पुरण चांगलं होतं. गॅसवर चटका देताना पुरण सतत हलवत राहावं लागतं. म्हणजे ते खाली लागत नाही आणि छान मोकळे व्हायला मदत होते.
५. पुरण गरम असतानाच शक्यतो पुरणयंत्रातून काढून घ्यावं. कारण ते जास्त गार झालं तर कडक होतं आणि मग ते नीट वाटलं जात नाही. तसंच पुरण घट्ट किंवा कडक आहे असं वाटलं तर त्याला थोडा दुधाचा शिपका द्यायचा म्हणजे ते नरम होण्यास मदत होते.