Join us  

Summer Special : अर्धा लिटर दुधाचं करा घरच्याघरी परफेक्ट विकतसारखं आईस्क्रीम, स्वस्तात मस्त समर स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 2:43 PM

Home Made Ice-cream Recipe Summer Special : घरच्या घरी कमी श्रमात तयार करा परफेक्ट आईस्क्रीम

उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असल्याने आपल्याला सतत काहीतरी गारेगार घ्यावसं वाटतं. पाणी, सरबत यांबरोबरच आईस्क्रीम, मिल्क शेक, फालुदा हे प्रकार उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला आणि मनालाही थंडावा देणारे पदार्थ असतात. उकाड्याने जीव हैराण झालेला असताना गारेगार काहीतरी पोटात गेल्यावर आपल्याला तृप्त झाल्यासारखे वाटते. कधी भर दुपारी तर कधी रात्रीचे जेवण झाल्यावर आपल्याला आईस्क्रीम खाण्याची आवर्जून इच्छा होते. मग बाहेर जाऊन खूप जास्त पैसे खर्च करुन आपण मोजून आईस्क्रीम घेऊन येतो. त्यापेक्षा अगदी अर्धा लिटर दुधापासून घरच्या घरी आईस्क्रीम तयार केले तर? लहान मुलांनाही आरोग्यासाठी चांगले आणि मनसोक्त खाता येईल असे आईस्क्रीम घरच्या घरी कसे करायचे पाहूया (Home Made Ice-cream Recipe Summer Special)..

साहित्य - 

१. व्हिप्ड क्रिम -एक ग्लास

२. दूध - अर्धा लिटर 

(Image : Google)

३. मिल्क पावडर - १ वाटी 

४. साखर - १. ५ वाटी 

५. फ्लेवर - आवडीनुसार मँगो, चॉकलेट, गुलकंद इत्यादी

आईस्क्रिम करण्याची पद्धत - 

१. आईस्क्रिम तयार करण्यासाठी दूध आधी उकळून थंड करून घ्या.

२. यामध्ये हळूहळू मिल्क पावडर घालून ते दूध ढवळत राहा, जेणेकरुन दुधाच्या गुठळ्या होणार नाहीत.

३. आता एका भांड्यात व्हिप्ड क्रिम घेऊन ब्लेंडरने फेटून ते सेट करून घ्या.

 

४. व्हिप्ड क्रिम छान फुलून आले आणि त्याला थोडा घट्टपणा आला की ते चांगले  तयार झाले आहे असे समजावे.

५. मग या क्रिममध्ये मिल्कपावडरचे दूध घाला आणि सगळं मिश्रण चांगले फेटून घ्या.

६. एअर टाईट डब्यात घालून आईस्क्रिम सेट करायला ठेवून द्या. ७ ते ८ तासांत उत्कृष्ट आईस्क्रिम तयार.

७. क्रिम आणि दूध हे मिश्रण एकत्र करताना आपल्याला आवडेल तो फ्लेवर यामध्ये घाला. आंब्याचे तुकडे, आंब्याचा पल्प आणि पिवळा रंग, चॉकलेट सिरप आणि चॉकलेटचे तुकडे, गुलकंद असे काहीही आपण यामध्ये घालू शकतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.