सतत पोळी-भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात. अनेकदा त्यांना पोळी खायचा कंटाळा येतो. पण मुलांनी हेल्दी खावं अशी तमाम मातावर्गाची इच्छा असते. मुलांना वडे, सामोसे, पिझ्झा, बर्गर, पास्ता अशा चमचमीत आणि अनहेल्दी गोष्टी मनापासून आवडतात. एरवी अतिशय कमी खाणारी मुलं असे पदार्थ समोर आले की मात्र दणकून खातात. जंक फूड आणि फास्ट फूडची लहान मुलांनाच काय मोठ्यांमध्येही क्रेझ असते. अशावेळी मुलांच्या पोटात हेल्दी काही जावं यासाठी आपल्याला शक्कल लढवावी लागते. सकाळची पोळी संध्याकाळी खायचा अनेकदा कंटाळा येतो (Home made Instant Roti Pizza Recipe).
इतकंच काय तर काहीवेळा रात्रीच्या पोळ्याही उरतात. अशावेळी या पोळ्यांचं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आपण घरच्या घरी अगदी झटपट पिझ्झा करु शकतो. विशेष म्हणजे हा पिझ्झा इतका छान होतो की मुलांना बाहेरचा पिझ्झा खाल्ल्यासारखा वाटतो. पोळीचा बेस असल्याने विनाकारण मैदाही पोटात जात नाही. पाहूया पोळीचा हा चविष्ट आणि हेल्दी पिझ्झा कसा करायचा..
१. पोळीला एखाद्या छोट्या झाकणाने मध्यभागी गोलाकार कापायचे.
२. त्यावर मायोनिज, पिझ्झा सॉस लावावा.
३. त्यावर कांद्याचे, टोमॅटोचे आणि शिमला मिरचीचे काप ठेवावेत.
४. त्यावर कॉर्न, पनीर, चीज, मिक्स्ड हर्ब, चिली फ्लेक्स घालावे.
५. तव्यावर बटर घालून हा पोळीचा पिझ्झा खरपूस भाजावा.
६. त्यानंतर त्याचे तुकडे करुन मुलांना खायला द्यावे.
७. चिज, पनीर, कॉर्न असल्याने मुलं आवडीने हा पिझ्झा खातात.