उन्हाळा सुरू झाला की गरमीने आपण अगदी हैराण होऊन जातो. अशावेळी सतत गारेगार काहीतरी खावसं वाटतं. मग कधी दारावर येणाऱ्या घंटागाडीवरुन किंवा नाक्यावरच्या दुकानातून आपण कुल्फी किंवा आईस्क्रीम आणतो. या विकतच्या कुल्फीमध्ये अनेकदा जिलेटीन किंवा काही प्रिझर्व्हेटीव्ह असण्याची शक्यता असते. अशी कुल्फी खाल्ली की आपल्याला तोंडात तुपकट लागते किंवा काही वेळा घसा बसण्याचीही शक्यता असते. इतकेच नाही तर या कुल्फीची किंमतही खूप जास्त असल्याने खिशाला भुर्दंड पडतो तो वेगळाच. त्यामुळे कुल्फी विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी परफेक्ट मलाई कुल्फी करु शकतो. कमीत कमी पदार्थांमध्ये आणि अगदी कमी वेळात होणारी ही कुल्फी कशी करायची ते पाहूया (Summer Special Home Made Kulfi Recipe)...
साहित्य -
१. दूध - २ लिटर
२. साखर - २ वाट्या
३. फ्रेश क्रिम - १ वाटी
४. मिल्क पावडर - १ वाटी
५. सुकामेवा - आवडीनुसार
६. वेलची पावडर - पाव चमचा
७. फ्लेवर - गुलकंद, मँगो, पिस्ता, स्ट्रॉबेरी इ.
कृती -
१. दूध एका कढईमध्ये किंवा पातेल्यात घेऊन १५ ते २० मिनीटे मध्यम गॅसवर ठेवून उकळावे आणि हलवत राहावे.
२. फ्रेश क्रिम, अर्धा कप दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन त्यापासून मावा तयार करुन घ्यायचा. याऐवजी आपण तयार खवाही वापरु शकतो.
३. उकळलेल्या दूधात मावा, साखर आणि सुकामेव्याचे काप घालून गाठी होणार नाहीत असे हलवत मध्यम आचेवर ठेवावे.
४. वेलची पावडर किंवा आपल्या आवडीचा फ्लेवर घालून गॅस बंद करावा.
५. हे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे. मावा, सुकामेवा आणि दूध आटवल्यामुळे हे मिश्रण काहीसे घट्टसर होते.
६. घरात कुल्फीचे साचे असतील तर त्यात नाहीतर बाऊल किंवा लहान आकाराच्या ग्लासमध्ये हे घट्टसर मिश्रण घालावे.
७. हे मिश्रण घातलेले साचे ६ ते ७ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवावेत. असतील तर याला काड्या लावाव्यात.
८. साचे बाहेर काढल्यानंतर ते साध्या पाण्यात बुडवून त्याची कुल्फी काढून खाण्यासाठी घ्यावी.
९. आपल्या आवडीनुसार वरुन ड्रायफ्रूटस, केशर असे घातल्यास कुल्फी आणखी चांगले लागते.