पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे खाऊ नये आणि घरीच हलके, ताजे अन्न खावे असे वारंवार सांगितले जाते. मात्र पावसाळ्यात छान गार हवा असल्याने आपल्याला चमचमीत काहीतरी खावेसे वाटते. पिझ्झा हा तर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. वेगवेगळ्या भाज्या, चिज, पनीर घातलेला गरमागरम पिझ्झा अनेक जण कोणत्याही वेळेला खाऊ शकतात. इतर पदार्थांपेक्षा हा पदार्थ ताजा असल्याने हेल्दी असतो असे म्हटले जात असले तरी यामध्ये असणारा मैदा मात्र आरोग्याला घातकच असतो. आता मैद्याशिवाय पिझ्झा कसा होणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर पाहूया घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हेल्दी पण सेम विकतसारखाच पिझ्झा कसा तयार करायचा...
साहित्य -
१. रवा - १ वाटी
२. दही - अर्धी वाटी
३. मीठ - चवीनुसार
४. मीरपूड - अर्धा चमचा
५. पिझ्झा स्प्रेड - २ चमचे
६. कांदा - अर्धा
७. कॉर्न - अर्धी वाटी
८. पनीर - अर्धी वाटी
९. शिमला मिरची - अर्धी वाटी
१०. तेल किंवा बटर - ४ चमचे
११. मिक्स्ड हर्ब - आवडीनुसार
१२. चीज - अर्धी वाटी
कृती -
१. रवा आणि दही एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यायचे.
२. यामध्ये मीठ आणि मीरपूड घालून पुन्हा चांगले एकजीव करायचे.
३. पॅनमध्ये बटर किंवा तेल घालून त्यावर या पिठाचे छोटे जाडसर बेस घालून दोन्ही बाजूने चांगेल परतून घ्यायचे.
४. दुसऱ्या बाजूला पलटल्यावर त्यावर पिझ्झा स्प्रेड लावायचा.
५. चीज स्लाईस घालून त्यावर कॉर्न, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पनीर असे आपल्या आवडीचे टॉपिंग घालायचे.
६. यावर मिक्स्ड हर्ब किंवा ओरीगॅनो आणि चिली फ्लेक्स आवडीनुसार घालून हा पिझ्झा गरमागरम असतानाच खायला घ्यायचा.