Join us  

घरच्याघरी करा पौष्टिक चॉकलेट बिस्किटे, करायला सोपे - चवही अप्रतिम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 6:34 PM

Nutritious Homemade Cookies : घरातील काही हेल्दी आणि आरोग्यासाठी चांगले पदार्थ वापरून मुलांसाठी झटपट बिस्कीट तयार करू शकतो.

लहान मुलांनाच नव्हे तर आपल्यासारख्या मोठ्यांना सुद्धा बिस्कीट खाण्याचा मोह आवरत नाही. गरमागरम चहा, कॉफी सोबत कुरकुरीत बिस्कीट खाणे म्हणजे सुखच आहे. घरात नाश्त्याला काही खायला नसेल तर आपण लगेच चहा बनवून सोबत बिस्कीट खाणे पसंत करतो. लहान मुलांना क्रिम बिस्कीट, चॉकलेट फ्लेवर्ड बिस्कीट अशा वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीट खायला खूप आवडतात. लहान मुलांना भूक लागली की ते लगेच बिस्कीट खायला मागतात. कधीतरी बिस्कीट खाणे ठिक आहे, परंतु रोज बिस्कीट खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. बिस्किटांमध्ये असणारे ग्लुटेन आणि लेसीथीन लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. बिस्किटांमध्ये भरपूर प्रमाणात बेकिंग सोडा, मैदा, प्रिझर्वेटिव्हज ,रीफाईन्ड गव्हाचे पीठ, ट्रांस फॅट आणि अन्‍य सिंथेटिक तत्‍व सुद्धा मिसळलेले असतात. अशा बिस्किटांमुळे मुलांना पचन संबंधी समस्या जसे की बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. यासाठी आपण घरातील काही हेल्दी आणि आरोग्यासाठी चांगले पदार्थ वापरून मुलांसाठी झटपट बिस्कीट तयार करू शकतो(If your child likes Biscuits, try these nutritious homemade Cookies).

साहित्य - १. बदामाचे पीठ / पावडर  - १०० ग्रॅम२. गव्हाचे पीठ - १०० ग्रॅम३. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून ४. कोकोनट शुगर - ७० ग्रॅम५. तेल -  १ टेबलस्पून६. दूध - ५५ मिलीलीटर 

kidzapzoe या इंस्टाग्राम पेजवरून लहान मुलांसाठी घरगुती हेल्दी बिस्किट्स कशी बनवायची हे समजून घेऊयात.

 

कृती - 

१. एका बाऊलमध्ये, बदामाचे पीठ / पावडर, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, कोकोनट शुगर, तेल, दूध हे सगळे जिन्नस घालून एकजीव करून घ्या.२. आता या एकजीव झालेल्या मिश्रणाला कणकेसारख मळून त्याचा एक गोळा तयार करून घ्या. ३. आता एक मायक्रोव्हेव्ह ट्रे घेऊन त्यात बटर पेपर अंथरून घ्यावा. ४. तयार झालेल्या कणकेचे गोल चपट आकाराचे बिस्कीट बनवून घ्या.     ५. हे आकार देऊन तयार झालेली बिस्कीट मायक्रोव्हेव्ह ट्रेमध्ये सेट करून घ्या. ६. १८० डिग्रीवर २५ मिनिटे ही बिस्किटे मायक्रोव्हेव्हमध्ये बेक करून घ्यावीत. 

घरगुती हेल्दी बिस्किटे खाण्यासाठी तयार आहेत. मुलांच्या टिफिनमध्ये सुका खाऊ म्हणून किंवा त्यांना भूक लागल्यावर ही हेल्दी बिस्किटे खायला देऊ शकता.

टॅग्स :अन्न